आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

जिल्हास्तरीय पीएम किसान उत्सव दिवसाचे यशस्वी आयोजन

रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PMKISAN) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २० व्या हप्ता लाभाचे वितरण कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शेतकऱ्यांना दाखवण्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, नाचणे येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमावेळी नाचणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच सौ. निलेखा नामदेव नाईक, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती सुचिता मनोहर घडशी, श्रीमती शिवानी दिनेश रेमुळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत प्रकाश रसाळ तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, कृषी संशोधन केंद्र शिरगावचे प्रभारी अधिकारी डॉ. सोनोने, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमंत फाटक, चिंचखरी, रत्नागिरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रधानमंत्री यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना २० व्या हप्त्याचे लाभ वितरणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. सोनोने यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विकसित केलेल्या व भात संशोधन केंद्र शिरगाव यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीत चांगले उत्पन्न देणाऱ्या भात बियाण्यांविषयी सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक शेतीमध्ये पुरस्कार प्राप्त शेतकरी हेमंत फाटक यांनी ते अवलंबत असलेल्या नैसर्गिक शेतीची माहिती शेतकऱ्यांना दिली व शेतकऱ्यांना रासायनिक खताचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी, रत्नागिरी विकास मेढे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी संपूर्ण देशांमध्ये 9.70 कोटी लाभार्थ्यांना 20500 कोटी निधीचा लाभ पीएम किसान योजनेच्या 20 वा हफ्ता वितरणाद्वारे होणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये त्यांनी सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1.72 लाख शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केले असून 20 वा हफ्ता साठी 1,61,113 पात्र लाभार्थी आहेत. त्यांना जवळजवळ 32.25 कोटी रुपयांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खाती जमा होणार आहे. आतापर्यंत एकूण 19 हप्त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 1,58,259 लाभार्थ्यांना 672 कोटी रुपयांचे सन्मान निधी प्राप्त झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील 19,651 लाभार्थ्यांना 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये नाचणे गावातील 139 तर व आंबेशेत गावातील 268 पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर राज्य शासनाकडून आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत 188.26 कोटी रुपयाचे अनुदान जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळाले आहे.

त्यानंतर त्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. यापुढे ॲग्री स्टॅक नोंदणी नसल्यास कुठल्याही कृषी विषयक लाभ तसेच पीएम किसान योजने लाभार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले.

त्याचबरोबर श्री. सदाफुले यांनी पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या योजनाद्वारे जिल्हा नियोजन निधी स्त्रोतातून भात 66.06 MT व नाचणी 4.35 MT पिकाचे बियाणे शेतकऱ्यांना खरीप हंगामात दिल्या बाबत सांगितले. तसेच सिंधूरत्न योजनेअंतर्गत आंबा व्यवसायिकांना बोलेरो पिकपचेही अनुदान स्वरूपात लाभ दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणेबाबत आवाहन केले. यापुढे सात बारा वर पिकाची नोंद नसल्यास कुठलाही लाभ मिळणार नसल्याचे तसेच कुठल्याही नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर नाचणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच श्रीमती निलेखा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी कृषी विभागाने दिलेल्या माहितीचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.कार्यक्रमाचे शेवटी प्रदीप भुवड यांनी आभार प्रदर्शन केले..या कार्यक्रमाचे रत्नागिरी जिल्ह्यातील १३१ ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!