राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार

मुंबई : पावसाने बहुतांश जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भ, मराठवाडा, कोकणसह, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर राहणार आहे.
कोकणात आज जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी राजा चिंतेत होता. पिकांना पावसाची गरज होती. आता पावसाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळतंय. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्ट महिना आला असला तरीही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याचे चित्र बघायला मिळतंय. दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मॉन्सून लवकरच दाखल झाला होता.
विशेष म्हणजे सुरूवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूचा येलो अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. पुढील पाच दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत.

