विद्या पटवर्धन यांचा सिंधू सन्मान पुरस्काराबद्दल कौतुक सोहळा

रत्नागिरी : राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका, रेणुका प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्या विद्या पटवर्धन गेली जवळपास ४८ वर्ष अग्निहोत्रचे व्रत करत इदं न मम चा वसा जपणाऱ्या असून, संघ कार्यात व अग्निहोत्रसाठी जीवन भर झटणारे कै. मधूभाऊ यांच्या सहधर्मचारिणी आहेत. मधूभाऊंनंतर तेवढ्यात निष्ठेने व्रत करणाऱ्या विद्या पटवर्धन यांना या वर्षी नागपूरच्या संघमित्रा सेवा प्रतिष्ठानचा सिंधू सन्मान पुरस्कार मिळाला असून, त्या निमित्त राष्ट्र सेविका समितीच्या जिजामाता शाखेत त्यांचा कौतुक सोहळा करण्यात आला.
सिंधूताई या राष्ट्र सेविका समितीच्या पहिल्या प्रचारिका आहेत. नागपूर मधून दिल्लीत जाऊन त्यांनी तिथे समिती कार्य केले. हे कार्य करत असतानाच महिला विषयक विविध काम त्यांनी केली. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
राष्ट्र सेविका समितीचे काम करत असतानाच पर्यावरणपूरक असे अग्निहोत्रचा प्रचार प्रसार व आचरण त्याच बरोबर महिला सक्षम व्हावी, स्वसंरक्षण क्षम व्हावी यासाठीचे खूप मोठे काम श्रीमत विद्या जीवनभर करत आहेत.
नुकताच नागपूर येथे हा पुरस्कार राष्ट्र सेविका समितीच्या वं. प्रमुख संचालिका शांताक्का यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. यानिमित्त त्यांच्या कौतुक सोहळ्यात त्यांचे औक्षण केले. अर्चना वैशंपायन यांनी वैयक्तिक गीत सादर केले. उमा दांडेकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. मानसी डिंगणकर यांनी मानपत्र वाचन केले. वेदिका मुळ्ये यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वन्दे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.



