काजू फळपीक विकास योजनेंतर्गत गोदाम प्रकल्प उभारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. काजू फळ विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत गोदाम उभारणीसाठी सविस्तर स्वारस्य निविदा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर ‘निविदा/ दरपत्रक’ टॅग खाली उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ आहे.
काजू फळपिक विकास योजनेच्या कार्यक्षेत्रात कोकण विभागातील सर्व तालुके व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भूदरगड, गडहिंग्लज आणि राधानगरी या तालुक्यांचा समावेश आहे. शासनास सादर केलेल्या गोदाम उभारणीच्या योजनेसाठी पाच वर्षांसाठी ६२ कोटी ५० लाख रुपयांच्या अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत एकूण १ लाख २५ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम उभारण्यासाठी मान्यता आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून राज्य शासनाला पाचशे, हजार व पाच हजार मे.टन क्षमतेच्या गोदामांची उभारणीबाबतच्या योजनेचे प्रारूप सादर करण्यात आली आहे. या प्रारूपानुसार गोदाम उभारणीसाठी लाभार्थी निवडीकरीता स्वारस्य निविदाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. इच्छुक लाभार्थींची यादी तयार करून शासनाचे मंजुरीअंती पात्र ठरलेल्या इच्छुक लाभार्थ्यांकडून गोदाम उभारणीबाबत सविस्तर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.
या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये काजू प्रक्रिया सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी काजू प्रक्रिया उद्योजक/खाजगी उद्योजक, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी (पीएसीएस), तालुका खरेदी विक्री संघ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा समावेश आहे. गोदाम उभारणीसाठी गोदाम क्षमतेनुसार २० गुंठे ते ८० गुंठे जागा आवश्यक असून स्वनिधीसाठी प्रकल्प खर्चाचे १५ टक्के रक्कम लाभार्थीकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे, उर्वरीत ८५ टक्के निधी बँककर्ज/ स्वनिधी स्वरूपात उपलब्ध करून घ्यावयाचा आहे. गोदाम उभारणीसाठी पाचशे, हजार व पाच हजार मे. टन क्षमतेसाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ७२ लाख ४९ हजार रुपये, १ कोटी २० लाख रुपये व ५ कोटी १० लाख रुपये अपेक्षित आहे.
या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थींनी घेण्यासाठी स्वारस्य अर्ज सादर करावेत व या योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या मुख्यालयाशी 020- 24528100 या क्रमांकावर प्रकल्प विभागाशी तसेच पणन मंडळाच्या विभागीय कार्यालय, रत्नागिरी येथे कृषी व्यवसाय पणन तज्ञ पवन बेर्डे (02352-299328, 7218350054) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले आहे.



