राष्ट्रविरोधी घोषणाबाजी अन् अराजकतेविरोधात रत्नागिरीत निघाली राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा

रत्नागिरी : राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या आणि हिंदू देवदेवतांचा अवमान करणाऱ्या देशविरोधी शक्तींना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आज रत्नागिरीत ‘संविधान सन्मान मंचातर्फे’ हजारो युवकांच्या सहभागाने एक विराट राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा काढण्यात आली. दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट (NEET) परीक्षेच्या नावाखाली झालेली अराजकता, सैनिकांविषयी काढलेले अनुद्गार आणि देशविघातक घोषणाबाजीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रहित आणि संविधानाचा सर्वोच्च सन्मान राखत आजच्या सजग ‘जेन झी’ पिढीने या मूक मोर्चानिमित्त अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवले.
सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच मारुती मंदिर परिसर हजारो तरुण-तरुणी, विद्यार्थी, जागरूक नागरिक आणि रत्नागिरीकरांनी गजबजून गेला होता. उपस्थितांच्या हातात राष्ट्रहित जपणारे आणि संविधानाचा महिमा सांगणारे फलक झळकत होते. मारुती मंदिर येथून अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने सुरू झालेली ही मूक पदयात्रा जिल्हा रुग्णालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आली. पदयात्रेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाजवळ पोहोचल्यावर नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर या पदयात्रेचे रूपांतर एका जाहीर सभेत झाले.
या वेळी बोलताना विद्यार्थी प्रतिनिधींनी जंतरमंतरवरील आंदोलनाचे खरे रूप उघडे पाडले. नीट परीक्षेचा बडगा दाखवून देशात अराजकता माजवणे आणि राष्ट्रविरोधी शक्तींनी या आंदोलनात कशी घुसखोरी केली, याचे सविस्तर दाखले त्यांनी दिले. “परंतु, आमची ही ‘जेन झी’ पिढी निद्रिस्त नसून राष्ट्राचे रक्षण करणारी सजग पिढी आहे, याची जाणीव देशविघातक शक्तींना करून दिल्याशिवाय राहणार नाही,” असा सज्जड दम या वेळी भरण्यात आला.
नीट परीक्षेचे कारण पुढे करून देशाच्या सुरक्षिततेला आणि सामाजिक ऐक्याला सुरुंग लावणाऱ्या कृत्यांचा तीव्र निषेध करण्यासाठीच ही पदयात्रा काढल्याचे मनोगत अजिंक्य केसरकर यांनी व्यक्त केले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने नागरिकांनी आपल्या तीव्र भावना या वेळी शासन आणि देशविरोधी विचारसरणीच्या लोकांपर्यंत पोहोचवल्या.
या राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेत लोकप्रतिनिधींचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, विविध नगरसेविका, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे , शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह अनेक मान्यवर, विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी आणि हजारो रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रहित, संविधानाचा आदर आणि सामाजिक सलोखा या त्रिसूत्रीचा संदेश देत पार पडलेल्या या पदयात्रेने संपूर्ण कोकणात एक नवा राष्ट्रीय विचारांचा संदेश दिला आहे.
“नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामध्ये निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण, लोकांमध्ये झालेला संभ्रम आणि सोशल मीडियावर पसरणाऱ्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरीतील युवकांनी व नागरिकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीने एक भव्य मूक मोर्चा काढला. या मोर्चाला सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला असून, याद्वारे संविधानाबद्दल असलेली निष्ठा आणि देशावरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भारत हा सांस्कृतिक देश म्हणून ओळखला जातो, मात्र अलीकडे जनतंत्रमंत्र्याच्या नावाखाली देशाची संस्कृती रस्त्यावर आणून ज्या प्रकारची आरोप-प्रत्यारोपांची घोषणाबाजी झाली, त्यामुळे देशभरातील देशप्रेमी नागरिक, संविधानाचा आदर करणारे घटक व्यथित झाले होते. यातूनच देशभरात अनेकांच्या क्रिया-प्रतिक्रिया उमटत असताना, आज रत्नागिरीत निघालेल्या या मूक मोर्चानंतर नागरिकांनी संविधानाप्रती व देशाप्रती असलेली अगाध श्रद्धा दाखवून दिली आहे. हा केवळ राजकीय मोर्चा नसून सर्वधर्मसमभावाचा आणि सर्वसमावेशकतेचा एक भाग होता, ज्यामध्ये तरुण-तरुणी, विविध धर्मांचे लोक, वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी आणि सर्व जाती-भेद विसरून नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. संविधानात सामावलेल्या मूल्यांचा आदर करत देशातील एकता टिकवून ठेवणे हीच या मोर्चाची मुख्य भूमिका होती.”
– प्रशांत यादव
भाजपा जिल्हाध्यक्ष (दक्षिण) रत्नागिरी.



