आरोग्यमुख्य बातमी

तीन वर्षांत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ : पालकमंत्री उदय सामंत

वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी असलेली रुग्णालयाची स्थिती व सद्यस्थितीचा आढावा

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयावर रुग्णांचा विश्वास वाढत आहे. मागील तीन वर्षांत उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या सेवेत मोठी वाढ झाली असून, रुग्णालयातही अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. डॉक्टरांची संख्याही वाढली आहे. भविष्यात एमबीबीएस झालेल्या डॉक्टरांसाठी पोस्ट ग्रॅज्युएटही याच ठिकाणी करता यावे म्हणून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी असलेली रुग्णालयाची स्थिती व सद्यस्थिती याची माहिती दिली.

ते म्हणाले, “महाविद्यालयाचे आता तीन वर्ष झाली आहेत. तिसर्‍या वर्षाला शिकणारे विद्यार्थी शिकावू डॉक्टर म्हणूनही सेवा बजावत आहेत. त्याचप्रमाणे या सध्या २२ प्राध्यापक शिकवत असून यात सहयोगी ६ तर सहाय्यक १६ प्राध्यापकही रुग्णालयात सेवा बजावत आहेत. वैद्यकीय अधिकार्‍यांची संख्या वाढल्यामुळे जिल्हा रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास वाढीला लागला आहे.

तिसर्‍या वर्षाला असणारे १०० विद्यार्थी याच ठिकाणी इंटरर्नशिप करणार आहेत. त्याचा फायदाही रुग्णांना होणार आहे. त्याचप्रमाणे परकार हॉस्पिटलला असणारे १२ एमएस डॉक्टर याठिकाणी लेक्चरर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.”

सन २०२१-२२ मध्ये ८९ हजार ८११ रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार करून घेतले होते, तेच सन २०२४-२४ मध्ये २ लाख २ हजार ६७७ रुग्णांनी रुग्णालयातून औषधोपचार करून घेतले. सन २०२१-२२ एकूण ९८३ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्याच २०२४- २५ मध्ये तब्बल २,५९२ शस्त्रक्रिया पार पडल्या. सिटी स्कॅन, श्वानदंश, सर्पदंश यांच्यावर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयात रत्नागिरीच्या रुग्णालयातील यंत्रसामुग्री अद्ययावत आहे.

लवकरच कर्मचार्‍यांचीही भरती केली जाणार आहे, त्यामध्ये १० क्लार्क, १०० सुरक्षा रक्षक, २०० नर्स, ४ वैद्यकीय समाजसेवक यांच्यासह अनेक जागा भरण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी ४२९ कोटी रुपयांच्या निधीला हायपॉवर कमिटीने मान्यता दिली असल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांचे उपकेंद्र रत्नागिरीत येत्या दोन महिन्यात सुरू होईल. त्यामुळे इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना रायगड लोणेरे येथे फेर्‍या माराव्या लागणार नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी याच ठिकाणी कॅम्पस इंटरव्हयू ही घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.

आयटीआयमध्ये गरीब कुटुंबातील अनेक मुले शिक्षण घेत आहेत, त्यामुळे या मुलांना अ‍ॅप्रन व शुज मोफत देण्याचा निर्णयही आपण घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील टिळक स्मारकामध्ये प्रवेशद्वाराजवळ असणार्‍या इमारतीत लोकामान्यांवरील पुस्तकांचे ग्रंथालयही लवकरच सुरू केले जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्कृत उपकेंद्रासाठी रत्नागिरीत एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

लोटे-परशुराम येथून थेट समुद्रात पाणी सोडण्यासाठी ४० कोटी रुपये उद्योग विभागातर्फे मंजूर करण्यात आले आहेत. गेली तीस वर्ष येथील उद्योजक असोसिएशनची मागणी होती. यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयमार्फत दोन वर्ष सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचेही ना. उदय सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!