‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम प्रभावीपणे राबवा
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांचे आवाहन

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरून स्वच्छता ही सेवा (एसएचएस) मोहीम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी केले.
यावर्षीच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेसाठी ‘स्वच्छोत्सव’ ही थीम निश्चित केली आहे. एक दिवस, एक घंटासोबत या उपक्रमांर्गत २५ सप्टेंबरला देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील गावस्तरावरील सर्व घटकांना सहभागी करून मोठ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव विशेष ग्रामसभेद्वारे घोषित करता येतील. या विशेष ग्रामसभा २ ऑक्टोबरपर्यंत कधीही आयोजित करता येणार आहे. याअभियानामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
स्वच्छता ही सेवा मोहिमेचा शुभारंभ तालुकास्तर व गावस्तरावर परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवून केला जाणार आहे. अस्वच्छ ठिकाणांची निवड करून या ठिकाणांची मॅपिंग आणि साफसफाई करण्यात येणार आहे. संस्था/प्रतिष्ठान व जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येणार आहे. सफाई मित्रासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार असून, यामध्ये सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व सफाई मित्रांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून, आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तालुका पातळीवर डिग्निटी कॅम्पचे आयोजन करून, वैयक्तिक लाभाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ सफाई मित्रांना दिला जाईल. पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
याद्वारे मोहीम कालावधीत जास्तीत जास्त गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव आणि स्वच्छ सुजल गाव म्हणून घोषित केले जाणार आहे. स्वच्छता ही सेवा २०२५ मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या आयटी पोर्टलवर अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे जिल्ह्यात राचविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांचे याद्वारे शासनस्तरावरून सनियंत्रण केले जाणार आहे.
हा उपक्रम ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांनी केले आहे.



