मुख्य बातमी

तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत ३ हजार ८५० प्रकरणांमध्ये ७ कोटी ७ लाख रक्कमेची तडजोड

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार १३ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते व रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष विनोद जाधव, विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालत पार पडली.

या लोकअदालतमध्ये जिल्ह्याभरातून ४ हजार ८१३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि १५ हजार ३४५ वाद दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोक अदालतमध्ये एकूण ३ हजार ८५० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. सात कोटी सात लाख एकोणऐंशी हजार पाचशे नऊ रुपये एवढ्या रक्कमेची तडजोड झाली. यामध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा उस्फूर्त सहभाग होता. लोकअदालतमध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेश संबंधीत खटले, वैवाहिक वाद अशी प्रकरणे तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बॅंका, पतसंस्था, थकीत विजबिले, टेलिफोनची थकीत बिले, मोटार वाहन चलन प्रकरणे इत्यादी प्रकरणांमध्ये तडजोड झाली.

लोक अदालत यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव आर. आर. पाटील व कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समिती येथील न्यायाधीश व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!