परचुरीतील शेतकर्यांचा विनय कोरेंच्या हस्ते सत्कार

रत्नागिरी : परचुरी (ता. संगमेश्वर) येथील श्री परशुराम दूध संकलन केंद्रातील शेतकर्यांचा २७ सप्टेंबर रोजी विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा (साखरपा विभाग) द्वितीय क्रमांकाने केंद्राला पुरस्कृत करण्यात आले. वारणानगर येथे हा समारंभ पार पडला.
२१ ऑक्टोबर २०२१ रोजी या दूध संकलन केंद्राची स्थापना झाली. परचुरी पंचक्रोशी येथील काही लोकांच्या मनात ‘कोकणात दूध व्यवसाय सहकारी तत्वावर राबवणे’ ही संकल्पना होती. सुरुवातीला शेतकर्यांच्या व इतर संघाच्या सहाय्याने ४० लिटर दुधापासून सुरुवात झाली. सुरुवातीला मोजकेच १०-१५ शेतकरी होते. सध्याच्या घडीला येथे ४०-४५ शेतकरी दूध पुरवठा करीत असून मध्यंतरीच्या काळात हे संकलन दिवसाला ४०० लिटरपर्यंत पोहोचले आहे.

कोणतीही नवीन गुंतवणूक न करता उपलब्ध पशुधनामध्ये देखील हा व्यवसाय उत्तम प्रकारे साथ देऊ शकतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो हे आता गावातील शेतकर्यांच्या हळूहळू लक्षात येत असून शेतकर्यांची संख्या वाढत जात आहे. भविष्यात शाश्वत प्रकारचा शेती व्यवसाय या दृष्टिकोनातून शेतकर्यांनी या व्यवसायाकडे पाहिले तर नक्कीच कोकणात रोजगार निर्मिती सुद्धा होईल व पशुधन संवर्धन सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकेल असे मत येथील शेतकर्यांनी व्यक्त केले.



