देवरहाटीच्या जमिनी देवस्थानाच्या नावे करण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे घंटानाद आंदोलन

रत्नागिरी : देवरहाटीच्या जमिनी देवस्थानाच्या नावे करण्याविषयी शासनाने चालू अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलावे, अशी आग्रही मागणी मंदिर विश्वस्तांनी करीत रत्नागिरी येथे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक संजय जोशी यांनी दिली.
देवरहाटी/देवराई हा ग्रामस्थांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक परंपरेचा विषय आहे, असे असूनही महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील प्रावधानाचा भंग करून, तसेच मंदिरे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याचे कारण देत बेकायदेशीरपणे देवस्थानचे नाव कमी केले आणि ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद केली. याद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांचे उल्लंघन केले आहे. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आज झालेल्या आंदोलनाद्वारे शासनाने हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अनादर केल्याने निषेध नोंदवण्यात आला. महाराष्ट्र शासनाने चालू अधिवेशनात ‘देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानाच्या नावे करण्याचा निर्णय घ्यावा’, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात अधिक तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासन आणि प्रशासनाला दिला आहे. या आंदोलनाला मंदिर विश्वस्तांचा चांगला प्रतिसाद लाभला.
आंदोलनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी संगमेश्वर येथील श्रीदेव निळकंठेश्वर देवस्थानचे अध्यक्ष जयंत आठल्ये, सचिव चैतन्य सरदेशपांडे, लांजा येथील श्री जुगाई पौलस्तेश्वर मंदिराचे विश्वस्त मुकुंद गांधी, संतोष लिंगायत, कारवली येथील श्री काळंबा देवीचे अरविंद वरेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, नेवरे येथील श्रीदेव विश्वेश्वरचे अध्यक्ष मुकुंद परांजपे, पाली येथील हिंदुत्वनिष्ठ प.वि. सावंत, मुरुगवाडा येथील श्री भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय पिलणकर, राजापूर येथील धोपेश्वर देवस्थानचे प्रकाश कांबळे, गोठणे दोनिवडेचे सुधीर विचारे, शीळ येथील गोपाळ गोंडाळ, न्यू हनुमान मंदिर, खडपेवाडी- राजापूरचे अध्यक्ष मनिष शिंदे, आंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ राजापूरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर राजापूरचे विजय हिवाळकर, वाटद-खंडाळा येथील सौ. प्राजक्ता जंगम यांच्यासह १०० हून अधिक विश्वस्त, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
देवस्थानांना विचारात न घेता, कोणतीही सूचना न देता आणि आपण देवस्थानचेच वारस आहोत या भ्रमाने देवस्थान जमिनी शासनाने कह्यात घेतल्या. शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आणि या देवरहाटी पूर्ववत देवस्थानच्या नावे व्हाव्यात, अशी मागणी करतो असे मनोहर मोरे, अध्यक्ष, श्री देव आदित्यनाथ मंदिर, नेवरे यांनी म्हटले आहे .
कोणत्याही जमिनीवरील मालकी हक्क सिद्ध करण्याचे सक्षम प्राधीकरण हे दिवाणी न्यायालय असतांना महसूल विभागाद्वारे देवराई/देवरहाटी जमिनीचा मालकी हक्क पालटणे, ही बेकायदेशीर, अवैध गोष्ट ठरते. हा राज्यघटनेने दिलेल्या हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील घालाही आहे. शासनाने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर करून नोंदी देवस्थानच्या नावे पूर्ववत कराव्यात अशी मागणी यावेळी गोविंद भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती यांनी केली.
शासनाने देवस्थानची देवरहाटीवरील नावे कमी केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मंदिर विश्वस्त आता मंदिरांच्या हक्कासाठी मंदिर महासंघाच्या माध्यमातून जागृत आणि संघटित होत आहेत. देवरहाटीच्या मागणीला यश मिळेपर्यंत हा लढा सुरू ठेवू असे सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ, जिल्हा संघटक यांनी सांगितले.



