सैनिकांमुळे देशातील नागरिक सुरक्षित : आमदार किरण सामंत
लांजा व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला आमदार किरण सामंत यांची उपस्थिती

लांजा : व्यापारी संघटनेच्या वतीने जी रॅली काढण्यात आली ती रॅली कुठल्याही पक्षाची नाही, तर लांजावासियांची आहे, राष्ट्रप्रेमाची आहे, अशी भावना व्यक्त करत आज देशातील नागरिक देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांमुळे सुरक्षित असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी केले.

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ लांजा व्यापारी संघटनेच्यावतीने आयोजित तिरंगा रॅलीमध्ये राष्ट्रप्रेमासाठी उपस्थित राहिलेल्या लांजावासियांचे आमदार किरण सामंत यांनी स्वागत केले. यावेळी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांचा सत्कार आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. जे सैनिक शहीद झाले त्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

राष्ट्रप्रेम, देशभक्तीमध्ये मतभेद असू शकत नाही, हे आज लांजावासियांनी दाखवून दिले आहे. पक्ष वेगळे असू शकतात, पण राष्ट्रप्रेमासाठी तिरंगा झेंड्याखाली एकत्र येऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर जनतेने घालून दिला. आमच्या कर्नल सोफिया कुरैशी आणि व्योमिका सिंह या दोन महिला भगिनींनी ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती जगाला सांगितली, त्यांचेही यावेळी आभार मानले. लांजा वासियांनी राष्ट्रावर केले प्रेम हे तिरंगा यात्रेतून सगळ्यांना दिसले. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांमुळे आम्ही सुखाने झोपतो, त्या सैनिकांना मोठी ताकद मिळावी, देशाच्या नागरिकांबरोबर लांजावासियांनी या सैनिकांसोबत आहोत हे या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिले, त्याबद्दल आमदार किरण सामंत यांनी व्यापारी संघ आणि समस्त लांजा व्यापाऱ्यांचे, आणि लांजा नागरिकांचे आभार मानले.

यावेळी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, लांजा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, राजू कुरूप, महंमद रखांगी, विजय कुरूप, सचिन माजलकेर, राहुल शिंदे, सुजित आंबेकर, प्रसाद माने, सचिन डोंगरकर, बाबा लांजेकर , संपदा वाघदरे, नितीन शेट्ये, हुसेन नेवरेकर, यांच्यासह तमाम लांजावासी आणि व्यापारी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.



