मुख्य बातमीशैक्षणिक

कै.ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकासह बालदोस्तांची मिरवणूक काढण्यात आली. गुलाबपुष्प देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आकर्षक फुग्यांनी आणि फुलांच्या माळांनी शालेय परिसर सजवण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे, माजी बालवाडी विभागप्रमुख श्रीमती कामिनी महाडिक, पालक प्रतिनिधी सौ. अलीम, सौ. जोगळेकर, सौ. लोटलीकर, शिक्षक हणमंत ऐवळे व सहकारी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.

या कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ. राजवाडे यांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण केले. तसेच श्री. पाटणकर व अन्य मान्यवर आणि पालकांनी मुलांवर पुष्पवर्षाव करून, गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. पोषण आहारामध्ये गोड शिऱ्याचा खाऊ देण्यात आल्यामुळे विद्यार्थी वर्ग खुश झाला. जंगी स्वागतामुळे विद्यार्थी आनंदी व उत्साहित होते. पाल्याचा स्वागत समारंभ व प्रवेशोत्सव पाहून उपस्थित पालक खुश दिसत होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, पालक बंधुभगिनी आणि पत्रकार यांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!