अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट
रत्नागिरी : दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असताना अचानक वातावरणात बदल होऊन ढग दाटून आले आणि गडगडासह चमकणाऱ्या विजांनी कोसळलेल्या परतीच्या पावसाने नागरिकांसह व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडवली.
दिवाळी तोंडावर आलेली असल्यामुळे बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कंदील रांगोळी तसेच दिवाळीच्या अनुषंगाने उपयुक्त वस्तूंची दुकाने थाटली आहेत. दिवाळीला उभे काही दिवस शिल्लक असल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची ही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे; मात्र अर्धा तासापूर्वी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे व्यापारांचा नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. दुचाकी वाहनधारकांनीही जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या करून आडोसा घेतला.
दुपारी साडेतीनपर्यंत कडाक्याचे ऊन होते; मात्र त्यानंतर अचानक वातावरणात बदल जाणवू लागला आणि उन्हाची तीव्रता कमी होऊन त्याजागी मळभ दाटून आली. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे व्यापाऱ्यांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे पाठोपाठ अचानक आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी मांडलेल्या वस्तूंचे नुकसान झाले.
दरम्यान, ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी भात कापणी सुरू असून परतीच्या पावसामुळे भाताचे नुकसान होण्याची शक्यता आहे.



