मुख्य बातमी

आकाशवाणीच्या ‘कोकण दर्शन’मध्ये ७ ऑगस्ट रोजी भातलावणी महोत्सवाच्या माहितीचे प्रसारण 

रत्नागिरी : कोकणातील मुसळधार पाऊस, लाल माती आणि भातशेतीची समृद्ध परंपरा, तसेच ग्रामीण पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीचा मनमोहक अनुभव देणारा ‘कोकण दर्शन’ हा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा पर्यटनावर आधारित कार्यक्रम उद्या (७ ऑगस्ट) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होणार आहे. कोकणातील माती, पर्जन्यमान इथली भातशेती आणि त्यामागील कृषी परंपरेविषयी शिरगाव (ता. जि. रत्नागिरी) येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एन. जी. सोनोन यांनी माहिती दिली आहे.

रत्नागिरीतील झरेवाडी यांसारख्या ग्रामीण भागात आयोजित केला जाणारा भातलावणी महोत्सव हा शहरांकडे गेलेल्या कोकणवासीयांना पुन्हा आपल्या मातीशी जोडणारा उपक्रम ठरत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने शेताच्या चिखलात प्रत्यक्ष उतरून भातलावणीचा अनुभव, शेताच्या बांधावरची न्याहारी आणि ग्रामीण जीवनशैलीची सफर याबरोबरच कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख याविषयी स्थानिक व्यावसायिक गिरीश शीतप माहिती देणार आहेत, तर आपल्या ताटात येणाऱ्या अन्नामागे अन्नदात्याचे किती कष्ट असतात, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणारी भातलावणीची सहल आणि प्रत्यक्ष शेतात भातलावणी करण्याचा अनुभव फाटक हायस्कूलचा विद्यार्थी अर्णव मकरंद पटवर्धन सांगणार आहे.

कोकणातील कमी क्षेत्रफळाच्या जमिनीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन कसे घेता येऊ शकते, याविषयी प्रगतशील शेतकरी विवेक केळकर माहिती देणार असून, शेतात काम करताना शेतकऱ्यांच्या श्रमाला बळ देणारे पारंपरिक भलरी गीताविषयी शेतकरी पांडुरंग कळंबटे माहिती देणार आहेत.

‘कोकण दर्शन’ कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.

कोकणची शेती, माती, ग्रामीण पर्यटन, खाद्यसंस्कृती आणि शेतकऱ्यांच्या श्रमाशी श्रोत्यांना जोडणारा हा विशेष कार्यक्रम ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.४० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारित होणार आहे.

हा कार्यक्रम मध्यमलहरी ११४३ KHz, एफ.एम. १०१.०५ MHz तसेच Newsonair मोबाईल ॲपवर ऐकता येईल. प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकृत YouTube चॅनेल ‘airratnagiri1248’ वरही ऐकता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!