क्रीडामुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे “कोकणरत्न पदवी” पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय कॅरमपटू व महाराष्ट्र शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेली देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम हिला स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे. आकांक्षा हिचा कारकिर्दीतील हा सहावा पुरस्कार आहे. आकांक्षा ही अवघी २० वर्षीय स्टार खेळाडू आहे.

तिने सलग तीन वेळा ज्युनिअर राज्यस्तरीय गटाचे विजेतेपदक मिळवून हॅट्रिक केली आहे. तिला राज्यस्तरावरील महिलांच्या एकेरी ओपन गटाचे तब्बल १३ वेळा विजेतेपद मिळविलेले असून एक हॅट्रिकही आकांक्षाच्या नावे आहे.

आकांक्षाने आतापर्यंत विविध स्तरावर ३६ सुवर्णपदके, १३ रौप्यपदके व १३ ब्रांझ पदके अशा एकूण ६२ पदकांची कमाई केली आहे. त्यामधील ४ सुवर्णपदके व १ रौप्यपदके अशी एकूण ५ पदके ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावर ४ सुवर्णपदके व २ रौप्यपदकेही तिने पटकावली आहेत.

आकांक्षाला आतापर्यंत राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्कार, तरुण भारत सन्मान पुरस्कार, राष्ट्रीय विश्वसमता क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.

स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे जाहीर झालेला कोकणरत्न पदवी पुरस्कार १३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून पत्रकार सचिन कळझुनकर तसेच धनंजय कुवेसकर, सुखदेव पवार आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकांक्षाला प्रदान केला जाणार आहे.

वयाच्या नवव्या वर्षापासून कॅरम खेळत असलेल्या आकांक्षाला तिचा मामा आणि आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, मामा महेश देवरुखकर, भाऊ यश कदम, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव केदार, यतीन ठाकूर, अजित सावंत, रत्नागिरी जिल्हा कॅरमचे श्री. भाटकर, श्री. साप्ते, नितीन लिमये व जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले.

आकांक्षाला इंडियन ऑइल कंपनीकडून स्कॉलरशिप मिळाली असून ती सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळत आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!