मुख्य बातमी

हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढावीत : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसीमध्ये कोणत्या कारखान्यांमध्ये कोणते रसायनांचे उत्पादन होते, त्यांची यादी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ते म्हणाले, सर्व विभागांनी कर्तव्य तसेच जबाबदारी म्हणून सक्रीय कार्यवाही करावी. कोणत्या कारखान्यात कोणते रासायनिक उत्पादन होते, त्याची यादी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन द्यावी. आपल्या कार्यालयाकडून अंमली पदार्थ, पोस्को आदी विषयांवर लहान मुलांमध्ये शाळेमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये जनजागृती करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न या विषयावर लक्ष केंद्रीत करून १५ ऑगस्टपर्यंत कमीत कमी १० कारवाया कराव्यात. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही पुरविण्यात येईल, असे पोलीस अधिक्षक श्री. बगाटे यांनी सांगितले. बंदर विभाग, कोस्ट गार्ड, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनीही अंमली पदार्थ अनुषंगाने सतर्क राहून कार्यवाही करावी. प्रलंबित हद्दपाराची प्रकरणे तात्काळ निकालात काढावीत. अंमली पदार्थ विरोधात प्रत्येक विभागाने कार्यवाहीत योगदान द्यावे. अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!