नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेचे ५ जुलै रोजी बक्षीस वितरण
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखा आयोजित नट श्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी (५ जुलै) सायंकाळी ५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉ. उदय सामंत, कै. रमेश भाटकर यांच्या पत्नी निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर आणि देऊळ बंद- २ चित्रपट फेम अभिनेते प्रवीण तरडे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरू झाली. अशा प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात पहिली स्पर्धा आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू होऊन ३१ मे २०२६ रोजी पूर्ण झाली. आठ महिने चाललेल्या या स्पर्धेमध्ये रत्नागिरी तालुक्यातील एकूण ५७ संघ सहभागी झाले होते. या ५७ नाटकांच्या माध्यमातून तालुक्यातील १२०९ कलाकारांनी सहभाग घेतला होता.
कोकणातील उत्सवाची परंपरा शेकडो वर्षांची आहे आणि उत्सवामध्ये नाटक सादर करण्याची परंपरा देखील तेवढीच शेकडो वर्षांची जुनी आहे. गावातील उत्सवासाठी नाटक बसविणे, त्याच्या तालमी करणे आणि उत्सवाच्या दिवशी सादर करणे ही प्रथा १५० ते २०० वर्ष कोकणामध्ये चालत आली आहे परंतु आज कालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात उत्सवातील नाटक बसविण्याची परंपरा हळूहळू लोप पावत चालल्याचे दिसून येते. या उत्सवाच्या निमित्ताने बसविल्या जाणाऱ्या नाटकांना नवसंजीवनी देण्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आलेली ही उत्सवी नाटकांची स्पर्धा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने गतवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील समस्त रसिक प्रेक्षक आणि नागरिकांना या बक्षीस समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.


