डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा: रत्नागिरी भाजप कार्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचा इतिहास, विचारधारा, संघटनात्मक कार्य आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर आधारित या स्पर्धेमुळे कार्यकर्त्यांचा पक्षाच्या विचारसरणीबाबतचा अभ्यास अधिक दृढ झाला.
स्पर्धेचा निकाल असा : प्रथम क्रमांक – ऋषिकेश केळकर आणि अनिरुद्ध फळणीकर, द्वितीय क्रमांक – शेखर लेले आणि प्रसाद बाष्ट्ये आणि तृतीय क्रमांक – संदीप रसाळ आणि प्रज्ञा टाकळे. सर्व विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
भाजप सरचिटणीस निलेश आखाडे यांनी प्रास्ताविक करताना या स्पर्धेचा मुख्य उद्दिष्ट सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष मा. दादा ढेकणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “अशा प्रकारच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा भविष्यात आणखी व्यापक आणि प्रभावी पद्धतीने आयोजित करण्यात येतील. भारतीय जनता पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि कार्यपद्धती यांचा सखोल अभ्यास असलेले जास्तीत जास्त कार्यकर्ते तयार होणे ही काळाची गरज आहे. अशा बौद्धिक उपक्रमांमुळे पक्षाचे सक्षम आणि अभ्यासू कार्यकर्ते घडण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात जिल्हाभरात अशा स्पर्धांचे आयोजन करून अधिकाधिक कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यात येईल.”
“स्पर्धेमध्ये विजय-पराजयापेक्षा भारतीय जनता पक्षाची विचारधारा, इतिहास आणि कार्यपद्धती यांचा अभ्यास होणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे,” असे यावेळी नमूद करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचेही कौतुक करण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष मा. दादा ढेकणे, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच जिल्हा व शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल आयोजकांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजक निलेश मराठे व सहसंयोजक संकेत कदम आणि सारिका शर्मा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले.



