मुख्य बातमी

ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील दाम्पत्याला ११.३७ लाखांचा गंडा

रत्नागिरी : ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेसह तिच्या पतीची तब्बल ११ लाख ३७ हजार १४ रुपये ५८ पैसे इतकी ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव येथे समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीची सोनल जगन्नाथ नाईक नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत सोनल नाईक हिने महिला व तिच्या पतीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ‘Julius Baer Mobile’ नावाचे ट्रेडिंग अॅप्लिकेशन लॉगइन करण्यास सांगून IPO आणि OTC ट्रेडिंगच्या माध्यमातून कमी कालावधीत मोठा नफा मिळू शकतो, असे आमिष दाखविण्यात आले.

२५ जून ते २३ जुलै या कालावधीत सोनल नाईक हिने विविध व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून संपर्क साधत संबंधित दाम्पत्याची दिशाभूल केली आणि वेळोवेळी पैसे गुंतविण्यास भाग पाडले. याचदरम्यान कुणाल सुमया नावाच्या व्यक्तीने स्वतःला ‘Julius Baer Mobile’चा प्रमुख असल्याचे भासवून कंपनीच्या नियमांनुसार संपूर्ण रक्कम भरावी लागेल, असे सांगत आणखी पैसे भरण्यास प्रवृत्त केले.

या प्रकाराला बळी पडून फिर्यादी महिलेच्या संयुक्त आयसीआयसीआय बँक खात्यातून ११ लाख १७ हजार १४ रुपये ५८ पैसे, तर तिचे पती महेंद्र यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या एनआरआय खात्यातून २० हजार रुपये अशा एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये ५८ पैशांची रक्कम संशयितांच्या सांगण्यावरून पाठविण्यात आली. मात्र त्यानंतर अपेक्षित परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये सोनल जगन्नाथ नाईक व कुणाल सुमया यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली असून, या ऑनलाइन फसवणुकीचा पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!