थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत “आप”ची ही रणांगणात उडी
रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी २४ उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार रविवारी अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. आज (१६ नोव्हेंबर) अर्ज भरण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांची मोठी झुंबड उडाली होती. आज एकाच दिवशी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. मात्र थेट नगराध्यक्षपदासाठी पहिला उमेदवारी आम आदमी पार्टीकडून सुस्मिता सुहास शिंदे यांनी अर्ज भरला आहे.
दरम्यान, महायुती, महाआघाडीसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. उद्या (ता. १७) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे गडबड होणार आहे. नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत नगरसेवकपदाच्या ३२ जागांसाठी ४४ च्या वर अर्ज दाखल झाले आहेत. शक्तीप्रदर्शन करत उमेदवार नगरपालिकेत अर्ज भरत होते.
नगरसेवकपदासाठी १० नोव्हेंबरपासून आजअखेर रत्नागिरीत ४४ अर्ज दाखल झाले. त्यात शिवसेनेचे (शिंदे) सर्वाधिक १३ अर्ज आहेत. त्यापाठोपाठ अपक्ष म्हणून ११ जणांनी अर्ज भरले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही ५ अर्ज भरले. “आप”कडून ६ जणांनी अर्ज भरत राजकीय पटलावर उडी घेतली आहे. शिवसेनेकडून आज अस्मिता सुशील चवंडे (१५ अ), मैथिली मयेकर (१२ अ), अनिकेत अनिल वालम (१ ब), सायमा नदाफ काझी ( ४ अ), मंजुळा विजय कदम (५ ब), सरिता जितेंद्र कदम (५ ब), कामना अरुण बेग (९ ब) यांनी अर्ज भरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रसाद सुरेश सावंत (३ ब), राजश्री बिपीन शिवलकर (१५ अ), साजीदखान अकबरखान पावसकर (८ ब), अमित वसंत विलणकर (१५ ब), नाझनीन युसुफ हकीम (९ ब) यांनी अर्ज भरले आहेत.
दरम्यान, रत्नागिरीत शिंदे शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ६ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात संतोष कीर (प्रभाग १४ ब), सौ. जागृती पिलणकर (प्रभाग १२, अ), सौ. सायली पाटील (प्रभाग ९, ब), नाहिदा सोलकर (प्रभाग ८, अ), इल्यास खोपेकर (प्रभाग ४, ब), सौ. प्रीती सुर्वे (प्रभाग ३, अ) यांचा समावेश आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापही जाहीर केलेला नाही. त्यामुळे उत्सुकता कायम आहे. तसेच भाजपला किती जागा देणार याचाही निर्णय सोमवारी सकाळपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे.



