आयुष्याच्या मैदानावर विजेता ठरण्यासाठी क्रीडास्पर्धा महत्त्वाच्या : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
सहायक आयुक्त समाज कल्याण जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव

रत्नागिरी : “मैदानावरील खेळ खिलाडू वृती शिकवत असतात. आयुष्याच्या मैदानात विजेता ठरायचे असेल तर स्वतःशी स्पर्धा असावी,” असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
सहायक आयुक्त समाज कल्याण द्वारा पाचल येथे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. यावेळी सहायक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.

श्री. सातपुते यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी संचलन करून मानवंदना दिली. श्री. सोळंकी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्ज्वलीत करण्यात आली. यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली.
खेळाडूंना शुभेच्छा देताना श्री. सातपुते म्हणाले, “मैदानी खेळ, क्रीडा स्पर्धांमुळे सर्वांगीण विकास होत असतो. मोबाईल-समाज माध्यमांच्या विश्वात मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित करत असते. मन, मेंदू अन् मनगट भक्कम करण्यासाठी मैदान उपयुक्त ठरते. आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर अजिबात निराश न होता, मात करण्यासाठीची सकारात्मक ऊर्जा ही मैदानी खेळातून येत असते. तुमच्यामधून देशासाठी उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत.”
श्री. सोळंकी म्हणाले, “मुंबई विभागात सर्वात प्रथम क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा बहुमान रत्नागिरीने मिळवला आहे. हे अभिमानास्पद आहे. त्याबद्दल श्री. घाटे यांचे अभिनंदन. आपण आपल्या आयुष्यात मैदान आणि वाचनालय या दोन स्थानांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. सशक्त मन, कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते ती खेळातून आणि वाचनातून. शैक्षणिक प्रगती कमी असली तरी ते खेळात प्रगतीपथावर असतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यश मिळो वा न मिळो पण अशा स्पर्धेत सहभागी होणं हे फार महत्त्वाचे आहे.”

यानंतर देवरुख वसतीगृह विरुद्ध मंडणगड वसतीगृह या मुलांच्या कबड्डी सामन्याचे तसेच चिपळूण वसतीगृह विरुद्ध जेलरोड वसतीगृह रत्नागिरी हा मुलींचा खो-खो चा सामना उद्घाटक आणि प्रमुख उपस्थितांच्या हस्ते नाणे फेक करून झाला. नामदेव पाटील, विजय पाटीला, आमोल पवार आणि श्रीकांत यादव यांनी पंच म्हणून काम पाहिले.



