क्रीडामुख्य बातमी

कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा उद्यापासून दापोलीत रंगणार 

रत्नागिरी : ५० वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ उद्यापासून (८ डिसेंबर) दापोली येथे सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या ट्रॅक सूट आणि टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना रत्नागिरीतील पोलीस परेड मैदान येथे पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्या हस्ते ट्रॅक सूट आणि टी-शर्टचे वितरण करण्यात आले.

कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ या भव्य क्रीडा महोत्सव दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर उद्यापासून (८ डिसेंबर) सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी कोकण परिक्षेत्रामधील नवी मुंबई, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील तसेच पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू यांचा उत्साहपूर्ण सहभाग असणार आहे.

पोलीस दलातील खेळाडूंमध्ये तंदुरुस्ती, शिस्त, संघ भावना (टीम स्पिरीट) आणि सौहार्द वाढविण्याच्या उद्देशाने कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कबड्डी यांसारख्या विविध खेळांचा समावेश आहे. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड आगामी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी केली जाणार आहे.

या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे  उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ८ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता होणार असून या उद्घाटन सोहळ्याची प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांची राहणार आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. सर्व सहभागी खेळाडूंची सुरक्षितता, सर्व संघांसाठी निवास, वाहतूक व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याचे पाणी केंद्रे आणि प्रथमोपचार केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. तसेच स्पर्धा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून पुरेसा बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी एकूण १२२० पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू उपस्थित राहणार असून विविध स्पर्धाद्वारे पोलीस दलाची क्रीडा कौशल्ये, शिस्त आणि टीमवर्कची झलक पाहायला मिळणार आहे. दरम्यान, उद्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पोलीस खेळाडूंसाठी ट्रॅक सूट आणि टी-शर्ट चे अनावरण आज रत्नागिरीतील पोलीस परेड मैदान येथे करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!