
रत्नागिरी : कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमा तीव्र केल्या असून, विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई करत २.३३ कोटींचा दंड वसूल केला आहे.
सुरक्षित आणि जबाबदार प्रवासावर लक्ष केंद्रित करत, कोकण रेल्वेने या मार्गावर तिकीट तपासणी मोहिमांची वारंवारता वाढवली आहे. या प्रयत्नांचा हेतू विनातिकीट प्रवासाला आळा घालणे आणि अधिकृत प्रवाशांसाठी सुरळीत, आरामदायी आणि सुखकर प्रवास करणे हा आहे.
नोव्हेंबर २०२५ मध्ये कोकण रेल्वेने १ हजार ७० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. यामध्ये ४२ हजार ९६५ अनधिकृत/अनियमित प्रवासी आढळले. या प्रवाशांकडून कोकण रेल्वेने भाडे आणि दंड म्हणून एकूण २.३३ कोटी रुपये वसूल केले आहेत.
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ७ हजार ४८३ विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. यामध्ये २ लाख ९० हजार ७८६ अनधिकृत/अनियमित प्रवासी आढळले. या कालावधीत रेल्वे भाडे आणि दंड म्हणून १७.८३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा असून, प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकिटे खरेदी करण्याचे आवाहन कोकण रेल्वेच्या वतीने सर्व करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर तिकिट तपासणी मोहिमा अधिक लक्ष केंद्रित करून सुरू राहणार असून, येत्या हिवाळा आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकृत प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासासाठी कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गावर तिकिट तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.



