मुख्य बातमीराजकारण

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय : अनिकेत पटवर्धन

भाजपाचे ३६ उमेदवार, २ नगराध्यक्ष विजयी : समन्वय राखून महायुती टिकवली

रत्नागिरी : जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६ विजयी झाले असून २ पैकी २ ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तसेच महायुतीमध्ये भाजपने ९ उमेदवार शिवसेनेतर्फे उभे केले होते. त्यातील ७ जण विजयी झाले आहेत. अशा प्रकारे महायुतीत समन्वय राखून रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा विराट विजय साकारला गेला असून अशी प्रतिक्रिया अनिकेत पटवर्धन यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी नगरपालिका निवडणूक मतमोजणीनंतर ते बोलत होते. भाजपाला जागा कमी देण्यात आल्याची टीका केली जात होती; परंतु काही जण उगाचच पक्षाची नाहक बदनामी करत होते. जागा वाटपात दूरदृष्टी ठेवली होती. भाजपाचा विचार करून आणि २०२९ च्या विविध निवडणुकीत विजय मिळवायचे लक्ष्य ठेवून अनिकेत पटवर्धन यांनी मोठी खेळी केली.

“सत्तेत सहभाग असेल तर सगळे होईल, पक्षाचा सन्मान होईल. त्यामुळेच मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून जागांचे वाटप करण्यात आले आहे. भविष्यात कोकणात नक्की भाजपा वाढणार आहे. काहीही झाले तरी २०२९ ची लोकसभा, २ विधानसभा, कोकण पदवीधर निवडणूक, शिक्षक निवडणूक या सगळ्या गोष्टीचा दुरगामी विचार करून ही महायुती केली व ती यशस्वी ठरल्याचे श्री. पटवर्धन यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतीच्या एकूण १५१ जागा नगरसेवक पदाच्या आहेत. त्यात ३९ जागा भाजपला मिळाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी भाजपाची ताकद वाढली आहे. कोठेही ताकद कमी झालेली नसून किंवा भाजपाला कमी लेखण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्व ठिकाणी महायुती अभेद्य आहे.

“२०२९ ला भाजप नक्की कोकणामध्ये खूप वाढलेले असेल, पक्षाला चांगले दिवस आलेले असतील. ४७ वर्षांनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप जिंकली, ही जागा कायम भाजपकडे राहावी, हा विचार करून टीकाकारांनी अपप्रचार करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

“भाजपाने भविष्यात नवीन येणाऱ्यांना संधी द्यायचे ठरवले आहे. यापुढे यंग ब्रिगेडला संधी दिली जाईल. त्यामुळे भाजप पुढील २५ वर्षे चालेल, जुन्या व ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन भाजप रत्नागिरीमध्ये नक्की वाढेल. २०२९ कोण कुठे असेल हे पण रत्नागिरीतील जनता बघेलच. तेव्हा पक्षासाठी दूरगामी विचार केला हे कळेल. आगामी जिल्हा परिषद किमान १० जागा व पंचायत समितीसाठी २० जागा भाजपाचे सदस्य महायुतीच्या माध्यमातून विजयी होतील. भाजपाचा विचार करून हे केले आहे, यात स्वार्थ नसून भविष्यात भाजपामध्ये अनेक लोक प्रवेश करतील,” असा विश्वास श्री. पटवर्धन यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!