मुख्य बातमी

रिंगणेत (लांजा) होणार ११ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन 

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने आयोजन 

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या (मुंबई) वतीने ११ वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्गसंपन्न रिंगणे (ता. लांजा) गावात ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत संमेलनाच्या संयोजका स्नेहल आयरे आणि काशीनाथ चव्हाण उपस्थित होते.

श्री. लाड म्हणाले, “साहित्य संमेलनासाठी रिंगणेला नाटककार ला. कृ. आयरे साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. यात प्रसिद्ध साहित्यिक इतिहासकारांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असून, आपल्याकडील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम होणार आहे. क्रांतीज्योत, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, काव्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर भूषविणार आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सतार वादक विदुर महाजन यांचे सतार वादन व मुलाखत होईल. यशवंत माणके यांच्या ‘चौथरा’ या नाटकाचा प्रयोग, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या एकांकिका होणार आहेत.”

२६ जानेवारी रोजी कोंडगे, कुरंग गावातील नदीचे जलपूजन केले जाणार आहे. ३० जानेवारीला रांगोळी प्रदर्शन, पाककला स्पर्धा होणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सकाळी ८ ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. १२.२० ते १.२० यावेळेत संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल.

त्यानंतर दुसऱ्या सत्रात दुपारी २ वाजता मुलांच्या एकांकिका, ४ वाजता मुलांचे कथाकथन व भाषणे होईल. सायंकाळच्या सत्रात ४ ते ५ यावेळेत “मराठी भाषा आणि तिचा इतिहास” या विषयावर कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ५ ते ६ यावेळेत कोकण संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. यामध्ये डॉ. निधी पटवर्धन, डॉ. पार्थ काळे, ऋषीकांत राऊत आणि रामदास खरे सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ६ ते ७ यावेळेत सचिन कर्डे यांचे शिवचरित्र होईल. ७.३० ते ८.३० यावेळेत स्थानिक कवी संमेलन होणार असून, त्यांचे अध्यक्षपद प्रकाश होळकर शेवटी भूषवतील. ८.३० ते ९.३० यावेळेत निमंत्रितांचे काव्य संमेलन होईल. त्यानंतर विदुर महाजन यांचे सतार वादन व मुलाखत होईल. त्यांच्याशी दिनेश मोरे संवाद साधतील.

१ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मुलांच्या एकांकिका फॅशन शो कार्यक्रम होईल. तसेच नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठांचा सन्मान आणि विविध पुरस्कारांचे वितरण होईल. त्यानंतर स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा होईल.

या संमेलनासाठी संघाचे मुंबईचे व स्थानिक कार्यकर्ते तसेच रिंगणे व परिसरातील गावातील ग्रामस्थ ही मेहनत घेत असून, या कार्यक्रमात साहित्यिक, कलाकार व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!