ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ कालवश

पुणे : भारतीय पर्यावरण चळवळीचे आधारस्तंभ आणि पश्चिम घाटांच्या जैवविविधतेचे कट्टर रक्षक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री पुण्यात प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक अभ्यासू, लोकाभिमुख आणि संवेदनशील वैज्ञानिक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे दिली.


