ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव पारीत
राजापूर पंचायत समिती मासिक सभा

राजापूर : सन २०२७ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी ओबीसी समाजाकडून मागणी होत आहे. या मागणीची दखल घेत शुक्रवारी पार पडलेल्या राजापूर तालुका पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी असा ठराव पारीत करण्यात आला आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. यासंदर्भात राजपत्र जारी करीत जनगणनेसंबंधी ३३ सूची जाहीर करण्यात आल्या. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा उल्लेख आहे; मात्र ओबीसींचा उल्लेख नाही. यामुळे ओबीसी समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. या अनुषंगाने राजापुरातील कुणबी समाज बांधवांनी जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. या मोहीमेतून तालुक्यातील ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देवून ओबीसींची स्वतंत्र रकान्याद्वारे जातनिहाय जनगणना करण्यात यावी अन्यथा सविनय असहकार करण्यात येईल अशा आशयाचा ठराव करून तो शासनाकडे पाठविण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तालुका पंचायत समितीनेही अशा प्रकारचा ठराव पारीत करून तो शासनाकडे पाठवावा अशा मागणीचे निवेदन सभापती नंदिनी कदम व उपसभापती अभिजीत गुरव यांना देण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत शुक्रवारी झालेल्या मासिक बैठकीत तसा ठराव सदस्य प्रसाद मोहकर यांनी मांडला. त्याला राजेश गुरव यांनी अनुमोदन दिले. ठरावावर साधक बाधक चर्चा होवून ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला.
तालुका पंचायत समितीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीने अशा प्रकारचा ठराव करून तो शासनाकडे पाठवावा जेणेकरून शासन त्याचा विचार करून सन २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना करून जात निहाय जनगणना करण्यासाठी भूमिका घेवू शकेल असे प्रसिध्द पत्रकाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
अशा प्रकारे ओबीसींची जातनिहाय जनगणना झाल्यास या उपलब्ध माहितीच्या आधारे ओबीसींची अचूक संख्या समजेल. त्या माहितीचा ओबीसी घटकाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीत असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच देशाच्या आर्थिक बजेटमध्ये प्रावधान म्हणून अनेक योजना कार्यान्वित करता येतील. तर या आधारे ओबीसींना अनेक सोयी सवलती मिळू शकतील. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाने शासनाकडे जातनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरावा त्यासाठी आवश्यक ते ठराव ग्रामपंचायतीना करण्यासाठी आग्रह धरावा, असे आवाहन या कुणबी समाजाचे समाजसेवक सुधीर तांबे, सत्यवान कणेरी, सतीश बंडबे, वसंत आंबेलकर, शांताराम शेढेकर, उमेश शिवगण, गोपाळ गोंडाळ, प्रभाकर मापेलकर, सुरेश बाईत आदींनी केले आहे.



