मुख्य बातमी

रत्नागिरीचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक आणि ‘एसआरपीएफ’चे कमांडंट तुषार पाटील यांचे निधन

रत्नागिरी : राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) दौंड येथील समादेशक (कमांडंट) आणि रत्नागिरीत अपर पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावलेले तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी (७ जून) पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रत्नागिरीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात, विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात आणि स्थानिक प्रशासनात महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते पोलीस दलात आणि स्थानिक जनतेतही परिचयाचे होते. रत्नागिरीतील यशस्वी कार्यकाळानंतर त्यांची बदली दौंड येथील एसआरपएफ गट क्रमांक ५ च्या समादेशक पदावर झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तुषार पाटील यांना अचानक रक्ताची उलटी झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ते कोमात गेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु काल त्यांची प्राणज्योत मालवली. सुमारे आठ वर्षांपूर्वी पाटील यांच्यावर किडनी प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनीच त्यांना किडनी दान केली होती.

तुषार पाटील हे पोलीस दलातील अत्यंत अभ्यासू, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर येथे शहर पोलीस उपअधीक्षक म्हणून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. कोल्हापूर करांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय अधिकारी होते. सुमारे सहा महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नतीने दौंड येथील ‘एसआरपीएफ’ गट क्रमांक ५ च्या समादेशक (अपर पोलीस अधीक्षक) पदावर नियुक्ती झाली होती.

जामनेर (जि. जळगाव) या त्यांच्या मूळ गावी आज (८ जून) सकाळी वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!