विकासकामांच्या झंजावातामुळे आमचा विजय निश्चित : तालुका प्रमुख सचिन बाईत

आबलोली (संदेश कदम) : “आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन सर्वांपर्यंत पोहोचलो आहोत आणि कोट्यवधींची कामे आमदार भास्कर जाधव यांच्या स्थानिक विकास निधीमधून चालू आहेत. कितीतरी कामे पूर्णत्वास जात आहेत. एका बाजूला आम्ही भूमिपूजन केलेल्या कामांचा झंजावात सुरू असताना विरोधकांनी फक्त नारळ फोडून ठेवले आहेत. विरोधकांचे एकही काम चालू झालेले दिसत नाही. माझ्याबरोबर पडवे पंचायत समिती गणाचे उमेदवार रवींद्र आंबेकर आहेत. पडवे गणातून ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून निवडणूक लढवत आहेत. कुठच्याही अमिषाला बळी न पडता, कुठच्याही प्रलोभनाला बळी न पडता ठाकरे शिवसेनेतच ते राहिले आहेत. ते पक्षाशी एकनिष्ठ असल्याने यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषद पडवे गटाचे उमेदवार सचिन बाईत यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “बाळासाहेबांचा पक्ष सोडून जाणाऱ्यांना शाप आहे आणि त्याच्यामुळेच रवींद्र आंबेकर यांचा विजय माझ्याबरोबरच निश्चित आहे. पडवे पंचायत समिती गणात सर्व उमेदवारांना मते पडतील त्यांची बेरीज जेवढी होईल तेवढी बेरीज रवींद्र आंबेकर यांच्या मतांची होईल.”
यावेळी बोलताना तालुका सचिव विलास गुरव म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आम्ही सर्वजण जयंती साजरी करून, त्यांना वंदन करूनच त्यांचे आशीर्वाद घेऊन या निवडणूक संपर्क कार्यालयात उमेदवारांसहित उपस्थित आहोत. निवडणुकीबद्दल सांगायचे झाले, तर एका वाक्यात सांगेन विजय हा आमचा, गुलाल आमचा आहे. विकास कामे आम्ही केलीत. कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव यांचा पूर्ण आशीर्वाद या गटाला आहे. त्यामुळे या तालुक्याचा सचिव म्हणून निश्चितपणे सांगेन या तालुक्यातील सगळ्या जागा विजयी होतील. आम्ही स्वतः या भागाचे नेतृत्व करत आहोत. आमचे सगळे कार्यकर्ते प्रचार यंत्रणेत उतरले आहेत. या वेळेला मशाल पेटवायचीच असा निर्धार मतदारांनी केला आहे.”
“पडवे जिल्हा परिषद गटातून सचिन बाईत, तर पंचायत समिती गणातून रवींद्र आंबेकर तसेच पाचेरी सडा गणातून शशिकला मोरे या उमेदवारी लढवत आहे. या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्णय हा इथल्याच मतदारांनी घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणचा विजय हा निश्चित असून मतदारांनी घेतलेला निर्णय आहे.”



