मुख्य बातमी

कोतवडेतील आंबेडकर भवनाची इमारत कागदोपत्री गायब

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४ च्या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप : चूक दुरूस्तीसाठी प्रशासनाला निवेदन

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ ही इमारत कागदोपत्री गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. असेसमेंट नमुना ८ वर नोंद असलेल्या या इमारतीचे नाव बदलून त्या ठिकाणी ‘विश्वशांती बुद्धविहार’ अशी पाटी लावण्यात आली आहे, असे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४ च्या पदाधिकाऱ्यांनी उघड केले आहे.

बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. १४, कोतवडे यांनी ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, कोतवडे बौद्धवाडीमध्ये ‘इमला नं. १४३०’ ही इमारत सरकारी असेसमेंट नमुना ८ वर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ या नावाने नोंद आहे. अनुक्रमांक २६८५ नुसार ‘बौद्धजन सेवा संघ कोतवडे’ असे या इमारतीचे वर्णन आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, या इमारतीवर ‘विश्वशांती बुद्धविहार’ असे नाव आढळून आले आहे. सरकारी दप्तरी एक नाव आणि प्रत्यक्षात दुसरेच नाव असल्याने मूळ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ ही वास्तू गायब झाली आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या संदर्भात बौद्धजन पंचायत समितीने ८ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. मात्र, ग्रामपंचायत कमिटीने या प्रकरणाची साधी दखलही न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद असलेले मूळ नाव डावलून नवीन नाव देणाऱ्यांना ग्रामपंचायत पाठीशी का घालत आहे? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“इमारतीचे सरकारी दप्तरी असलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ हेच नाव कायम ठेवण्यात यावे आणि सध्या बेकायदेशीरपणे देण्यात आलेले ‘विश्वशांती बुद्धविहार’ हे नाव रद्दबातल करण्यात यावे,” अशी आग्रही मागणी बौद्धजन पंचायत समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!