ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
‘१४५६७’ या हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून (१ ऑक्टोबर) रत्नागिरी जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ आणि कल्याणासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व आदराची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी विशेष ‘आजोबा-आजी, शिक्षक व मुले’ (GPTM) बैठकींचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकांमधून नव्या पिढीला ज्येष्ठांचे महत्त्व आणि संस्कारांची जाणीव करून दिली जाणार आहे. याशिवाय, शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांमार्फत पदपथ आणि प्रभातफेरी काढून जनजागृती केली जाईल, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा नेहमी आदर करण्याची सामूहिक शपथही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
आरोग्य संवर्धनाचा भाग म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने खेडशी येथील ‘माहेर संस्था’ आणि लांजा तालुक्यातील कुर्वे येथील ‘भाकर संस्था’ संचलित वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ज्येष्ठांची सायबर फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस विभाग व विधी विभागामार्फत विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कायदेविषयक अधिकार आणि विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाईल.
ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीच्या वेळी अथवा मदतीसाठी शासनाच्या ‘१४५६७’ या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सोनटक्के यांनी केले आहे.


