‘एक राखी भारतीय जवानांसाठी ‘ या उपक्रमाद्वारे ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थिनींनी पाठवल्या सीमेवरील सैनिकांसाठी राख्या

रत्नागिरी : सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्ताने येणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये एक राखी भारतीय जवानांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनी व शाळेतील शिक्षिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन सैनिकांसाठी स्वतःच्या हाताने छान छान राख्या बनवल्या. या प्रत्येक राखीसोबत सैनिकांसाठी संदेश कार्डही तयार करण्यात आले. या राख्या टपाल सेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष सीमेवरील सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या.
या उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, सर्जनशीलता ही मूल्ये जोपासण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर स्वतः बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवता आल्यामुळे विद्यार्थिनींना त्याचा विशेष आनंद झाला. निष्ठेने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आपल्या मनात कायम कृतज्ञता, आपुलकी असली पाहिजे, याची जाणीव विद्यार्थिनींच्या मनात निर्माण झाली.हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्वा भोरे व श्रेया मांडवकर या शिक्षिकांनी व लिपिक विक्रांत भाटकर यांनी विशेष मेहनत घेतली. शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.



