मुख्य बातमी

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी सरासरी जिल्ह्यात ५६.७९ टक्के मतदान 

रत्नागिरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी काल (७ फेब्रुवारी) सरासरी ५६.७९ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली असून सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ५६, तर पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला होता. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. प्रशासनाने देखील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.

शनिवारी सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासात जिल्ह्यात १ लाख ३१ हजार ९१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासांमध्ये ११.२४ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. यात ७६ हजार २२१ पुरुष मतदारांनी, तर ५५ हजार ६८४ स्त्री मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ११.३० पर्यंत या कालावधीत जिल्ह्यात २६.४८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. एकूण ११ लाख ७३ हजार ९०२ मतदारांपैकी ३ लाख १० हजार ८०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख ६० हजार २७६ पुरुष, तर १ लाख ५० हजार ५२७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.५२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार ९०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात २ लाख २६ हजार १५० पुरुष आणि २ लाख ३७ हजार ७५३ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारनंतर मतदानाचा टक्का काही प्रमाणात घसरला. दुपारी १.३० ते ३.३० या दोन तासात केवळ केवळ ७.८६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत एकूण ५ लाख ५६ हजार १५९ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २ लाख ६९ हजार ८२६ पुरुष, तर २ लाख ८६ हजार ३३२ स्त्री मतदारांनी मतदान केल्याची नोंद करण्यात आली.

मतदानाच्या अंतिम दोन तासात मतदानासाठी मतदान केंद्रांवर मतदारांनी पुन्हा गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी होती. ५.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५६.७९ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदान प्रक्रिया पार पडताच प्रत्येक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन पोलिस बंदोबस्तात प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. प्रत्येक स्ट्राँग रूम बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या (९ फेब्रुवारी) सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या काही तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!