
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ५६ तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी काल (७ फेब्रुवारी) जिल्ह्यातील १ हजार ६९३ मतदान केंद्रावर मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या (९ फेब्रुवारी) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ४७२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य कळणार असून ईव्हीएम मशीनचा पेटारा उघडणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून त्या- त्या तालुक्यातील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
विविध तालुक्यात फेऱ्यानिहाय मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मंडणगडात दोन तासात, तर काही ठिकाणी ५ ते ६, ६.३० तासांत अंतिम निकाल येईल.
जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत काँटे की लढत झाली आहे. घरोघरी, कॉर्नर सभा घेवून प्रचार करण्यात आला. काही ठिकाणी चौरंगी, तिरंगी लढत झालेली आहे. काहीठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. शनिवारी सकाळी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान झाले. ११ लाख ७३ हजार ८९९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ५५.७९ टक्के इतके मतदान झाले.
एव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उद्या सकाळी १० वाजल्यापासून पोस्टल मतदानाने मतमोजणीस सुरू होईल. एकंदरीत, शिवसेना शिंदे सेनेच्या वतीने आपला गड सुरक्षित ठेवून निवडणुकीचा गुलाल उधळणार की महाविकास आघाडी गणित बिघडवणार कोण होणार रत्नागिरीचा नवा कारभारी हे ईव्हीएम मशीन उघडल्यानंतरच स्पष्ट होईल.
असा असणार फेऱ्यानिहाय निकाल
तालुका ईव्हीएम टेबल टपाली टेबल सरासरी फेऱ्या
रत्नागिरी 20 2 19
चिपळूण 18 00 16
खेड 14 2 18
दापोली 14 4 20
गुहागर 20 2 9
राजापूर 24 6 9
लांजा 14 1 15
मंडणगड 12 2 5
संगमेश्वर 14 2 20
मंडणगडात पावणेदोन तासात निकाल हाती
उद्या काही ठिकाणी निकाल हाती येण्यासाठी सहा तास लागणार असून, मंडणगडात १ तास ४० मिनिटांत निवडणुकीचा पहिला निकाल लागणार आहे. तर गुहागर, राजापूरात ३ तासात निकाल स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी ६ तास ३० मिनिटे, संगमेश्वर ६ तास ४० मिनिटे, दापोली ६ तास ४०, खेडमध्ये ६ तास लागतील. चिपळूणमध्ये ५ तास २० मिनिटे, तर लांजा तालुक्यात ५ तासात अंदाजे निकाल हाती येणार आहे.



