प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासन सहाय्यीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमइ) या योजनेतंर्गत १० ते १२ फेब्रुवारी रोजी प्रक्रिया उद्योगाना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यशाळेला नवीन प्रक्रिया उद्योग करण्यासाठी इच्छुक शेतकरी, प्रक्रियादार, अर्जदार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे आहे.
केंद्र शासनाच्या सूचनांनुसार १६ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक व गट सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीकरिता प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ घेता येतो. तसेच सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणी करिता प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त ३ कोटीं रुपयांपर्यंत लाभ मिळतो. जिल्ह्यात आज अखेर ४९९ प्रक्रिया योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.
१० फेब्रुवारी रोजी नारळ संशोधन केंद्र सभागृह भाट्ये, तालुका कृषी अधिकारी कार्यालय गुहागर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय मंडणगड येथे, ११ फेब्रुवारी रोजी लांजा तहसील कार्यालय सभागृह, तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय दापोली तर १२ फेब्रुवारी रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय राजापूर, तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमेश्वर व तालुका कृषी अधिकारी कार्यालय खेड याठिकाणी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे
या कार्यशाळेमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, (डीआरपी कृषी/ एमएसआरएलएम/डीएवाय-एनयूएलएम), बँक शाखा अधिकारी उपस्थिती राहणार असून या कार्यशाळेत योजनेविषयी संपूर्ण माहिती, नवीन प्रक्रिया उद्योगासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकरी, प्रक्रियादार यांची अर्ज नोंदणी, बँक स्तरावर प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावांचा निपटारा करणे, नोंदणी केलेल्या अर्जदारांची अर्ज पूर्ण करून जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविणे, प्रक्रिया उद्योगांविषयी मार्गदर्शन करणे यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ज्या शेतकरी, प्रक्रियादार यांचे अर्ज बँक स्तरावर प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांनी सुद्धा या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


