मुख्य बातमी

जिल्हा परिषद येथील श्री दत्तगुरूंच्या नूतनमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत उजव्या बाजूला असणाऱ्या श्री महापुरुष व दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या नूतनमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण सोहळा २५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे मंदिर हे जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी बंधू भगिनी तसेच परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर खूप जुने झाले असल्याने मंदिर नवीन बांधण्याचा संकल्प श्री देव महापुरूष व दत्तगुरू भक्त मंडळामार्फत गेल्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच सन २०२०-२१ मध्ये करण्यात आला होता. १८ डिसेंबर २०२१ रोजी दत्तजयंतीच्या दिवशी या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते.

आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळामार्फत वेळोवेळी केलेल्या आवाहनांना सकारात्मक प्रतिसाद देवून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पदाधिकारी, पंचायत समिती पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद खातेप्रमुख, अन्य अधिकारी, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी बंधू-भगिनी, पंचायत समिती कर्मचारी बंधू-भगिनी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषदेमधील विविध योजनांचे ठेकेदार तसेच जिल्ह्यातील ग्रामस्थ अशा सर्वांकडून मिळालेल्या आर्थिक व साहित्यरूपी सहकार्यामधूनच मंदिराची अतिशय भव्य दिव्य अशी नवीन वास्तू उभी राहिली आहे. या मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे.

श्री महापुरूष व दत्त मंदिर, जिल्हा परिषद आवार, रत्नागिरी येथील श्री दत्तगुरूंच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम २५ व २६ फेब्रुवारी असे दोन दिवस होणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री दत्त गुरूंची नूतन मूर्ती व मंदिरांच्या कळसांची सवाद्य मिरवणूक (माळनाका ते जिल्हा परिषद रत्नागिरी) निघेल.

२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ यावेळेत वास्तूशांत, पूण्याहवाचन, देवता स्थापन, मूर्तीवर जलाधिवास व होमहवनादी कार्यक्रम होईल. सायंकाळी ५ ते ६.३० यावेळेत सुश्राव्य भजन (स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळ्ये, ता. जि. रत्नागिरी बुवा उदय मेस्त्री), सायंकाळी ७ ते रात्री ९.३० अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम – भक्तीरंग (रत्नागिरी शहरातील स्थानिक कलाकार यांचा गायनाचा कार्यक्रम) होईल.

२६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ श्री दत्तगुरूंच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, पूजांग हवन व पूर्णाहूती, दुपारी २.१५ वाजता स्वामी श्री विद्यानृसिंह भारती, शंकराचार्य, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते श्री महापुरूष व दत्त मंदिराचा कलशारोपण सोहळा होईल. दुपारी २.३० ते ३.३० यावेळेत महाप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ५ ते ६.३० यावेळेत सुश्राव्य भजन (श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे, ता. राजापूर जि. रत्नागिरी बुवा संतोष शिरसेकर) होईल.

त्यानंतर श्री महापुरूष व दत्त मंदिर, जिल्हा परिषद आवार, रत्नागिरी येथील श्री दत्तगुरूंच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश सिनकर व सचिव किरण वाडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!