राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक व शाश्वत प्रकल्पाची उभारणी करण्याची मागणी
आमदार किरण सामंत यांच्याकडे तेली समाजाच्या वतीने निवेदन सादर

राजापूर : राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने तालुक्यात पर्यावरणपूरक व शाश्वत उद्योग प्रकल्प उभारून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील युवक-युवतींना शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने त्यांना मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांकडे नोकरीसाठी स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणांची संख्या घटत असून स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
पूर्वी तालुक्यात आंबा, काजू व अन्य फलोत्पादनावर आधारित शेतीमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत होता. मात्र बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि जंगली प्राण्यांचा वाढता त्रास यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असून तरुण पिढी शेतीकडे पाठ फिरवत आहे. परिणामी पारंपरिक व्यवसाय टिकवणे अवघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यात पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प उभारल्यास स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, स्थलांतर कमी होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. भविष्यात असा प्रकल्प मंजूर झाल्यास त्यास तेली समाजाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.
ही मागणी राज्य शासनापर्यंत पोहोचवून सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी विनंती आमदार सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच उद्योग मंत्री व पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे ही बाब मांडून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक तरुणांना आपल्या गावीच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदन सादर करताना भाई मणचेकर (खजिनदार), भाऊ लांजेकर, बाळू रहाटे, जितेंद्र तुळसावडेकर, राजाभाऊ रसाळ, नगरसेविका ऊर्मिला बाकाळकर, स्नेहा रहाटे, प्रशांत कुवेसकर, निलेश खानविलकर, संतोष बाकाळकर, तुषार नेवरेकर, मारुती खेडसकर, शंकर सोलगावकर, वैभव कुवेसकर, पत्रकार आदित्य बाकाळकर, शीतल रहाटे, सुप्रिया रहाटे, सुशील टिळेकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



