मुख्य बातमी

अस्मिता केंद्रेंच्या रूपात मंडणगडला प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद 

उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची वर्णी 

रत्नागिरी : जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत असून, स्वातंत्र्यानंतर तब्बल ७८ वर्षांनी पहिल्यांदाच मंडणगड तालुक्याला जिल्हा परिषदेचे सर्वोच्च अध्यक्षपद मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील भिंगळोली गटातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांच्या नावांची अधिकृत घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने जिल्ह्यावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ५६ जागांपैकी शिवसेनेने ४१ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत शिवसेनेने ४६ उमेदवार उभे केले होते, त्यापैकी ४१ जणांनी विजय मिळवला.

पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मोठी घौडदौड केली आहे. भाजपला ४ जागा मिळाल्या असून, मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने ५ जागा जिंकल्या आहेत. यामुळे महायुतीचे संख्याबळ ५० वर पोहोचले असून जिल्हा परिषदेवर भगवा फडकला आहे.

महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदासाठी अस्मिता केंद्रे यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील भिंगळोली गटातून त्या विजयी झाल्या आहेत. त्या अनुभवी सदस्य असून, यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये असतानाही जिल्हा परिषदेत उत्तम कामगिरी केली होती. वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला होईल, या विश्वासाने ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

उपाध्यक्षपदी वर्णी लागलेले विलास चाळके हे पालकमंत्री उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. काही वर्षांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. संघटन कौशल्य आणि प्रशासकीय कामाची जाण यामुळे त्यांना ही संधी मिळाली आहे.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातून पहिल्यांदाच अध्यक्ष मिळाल्याने मंडणगड आणि दापोली परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, शिवसेनेतर्फे नवनियुक्त अध्यक्षांना सव्वा वर्षाचा (१५ महिने) कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते, पाणी आणि आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यावर भर दिला जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!