मुख्य बातमी

कोमसाप साहित्यिकांसाठी हक्काचे व्यासपीठ असल्याचा अभिमान : केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर 

कोकण मराठी साहित्य परिषदेचा ३५ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न 

मालगुंड : मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत करून, ती सातत्याने प्रवाहित ठेवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी १९९१ मध्ये सुरू केलेली कोकण मराठी साहित्य परिषद ही साहित्यिक संस्था कोकणातील असंख्य लिहित्या हातांना प्रेरणा देणारी ठरली. तसेच साहित्यिकांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ बनत असल्याचा संस्थेची अध्यक्ष या नात्याने अभिमान वाटतो. सोबतच या माध्यमातून अनेक साहित्यिक निर्माण झाल्याचे समाधान असल्याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी व्यक्त केले. कोमसापच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वर्धापन दिन सोहळा या कार्यक्रमात बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, कोमसाप ही संस्था मागील अनेक वर्ष सातत्याने विविध साहित्य उपक्रम राबवत अनेक साहित्यिकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कोकणातील सातही जिल्ह्यामध्ये परिषदेच्या अनेक शाखा कार्यरत असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साहित्यिक चळवळ प्रवाही बनत असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी गौरवोद्गार काढले.

प्रारंभी दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन झाल्यानंतर कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत कोमसापचा इतिहास सर्वांना सांगत भविष्यामध्ये कोमसापच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सीताराम पाटील, उषा परब आणि स्व. वि. सी. गुर्जर यांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी कोमसाप ही नव्या स्वरूपामध्ये जागतिक पटलावर उदयाला येत असून, अनेक उपक्रम महाराष्ट्रातच नव्हे, देशासह परदेशातही राबविणारी एकमेव संस्था असल्याचे सांगितले. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व सभासदांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी ही काम कायम प्रवाहित राहण्यासाठी सतत कार्यरत राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे नमूद केले. कोमसापच्या प्रत्येक सभासदांच्या उपक्रमात आम्ही सहभागी होऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

वर्धापन दिनानिमित्त प्रवास कोमसापचा या उपक्रमांतर्गत सर्व जिल्ह्यातील एकाने कोमसापची स्थापना ते २०२६ – एक आढावा, कोमसापच्या भविष्याततील वाटचालीत आपली भूमिका, कोकणातील लेखक, कवी आणि साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ – कोमसाप, मराठी भाषा आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धिगत होण्यासाठी कोमसापचे योगदान, कोमसाप : एक कुटुंब, कोमसापची विविध संमेलने – साहित्य चळवळीतील वैविध्यता, कोमसाप ते जागतिक कोमसाप, कवी केशवसुत स्मारक : एक प्रेरणादायी व दिशादर्शक, युवाशक्तीचे आव्हान आणि आवाहन या विषयांवर अनुक्रमे आनंद वैद्य सिंधुदुर्ग, बाळ कांदळकर ठाणे, दीपा ठाणेकर पालघर, संजय गुंजाळ रायगड, चंद्रमोहन देसाई रत्नागिरी, विद्या प्रभू मुंबई, दमयंती भोईर, गजानन पाटील आणि अरुण मोर्ये यांनी आपली मतं व्यक्त केली.

या कार्यक्रमांमध्ये कोमसापच्या आजवरच्या वाटचालीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या अनेक ज्येष्ठ सदस्यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ सदस्यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झालेल्या मिनार पाटील आणि कैरो, इजिप्त या देशांमध्ये लोकमत वन वर्ड पुरस्कार मिळालेल्या प्रदीप ढवळ यांचाही मधुभाईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने खुले व निमंत्रितांचे कवी संमेलन घेण्यात आली. या कवितांच्या माध्यमातून अनेक विषयांवर कवींनी आपापल्या कविता सादर करत सर्व उपस्थित रसिकांची दाद मिळविली. निमंत्रिताच्या कवी संमेलनामध्ये आगरी भाषेतील प्रसिद्ध कवी तथा रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, तळागाळातील लोकांचा आवाज बनलेले आणि आपल्या आवाजांच्या माध्यमातून विचार व्यक्त करणारे कवी राष्ट्रपाल सावंत आणि विविध कवितांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यवस्था सगळ्यांच्या समोर आपल्या कवितांच्या माध्यमातून सादर करणारे अरुण मोर्ये यांनी या ठिकाणी कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यासोबतच कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हे कवी संमेलन यशस्वी केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी आणि कोमसापच्या रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, मालगुंड शाखा अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्ष शुभदा मुळे, सचिव विलास राणे, रामानंद लिमये, शिरीष लिंगायत, अरुण मोर्ये, चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, विद्याधर कांबळे यांच्यासह स्मारक व्यवस्थापन समितीचे स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे आणि इतर कर्मचारी आदी लोकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.

ज्येष्ठ सदस्यांचा आवर्जून केलेल्या सत्कारामुळे सर्व सत्कार मूर्तींनी समाधान व्यक्त करत कृत्य – कृत्य झाल्याची भावना व्यक्त करत उपस्थित सर्वांनीच कोमसापच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला कोमसापचे सभासद, विविध समित्याचे प्रमुख, पदाधिकारी, सत्कारमूर्ती, यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!