गुहागरमध्ये २८ रोजी कलावंतांचा सन्मान सोहळा
प्रबोधनपर कला जपणाऱ्या ५० हून अधिक कलावंतांचा गौरव

आबलोली (संदेश कदम) : सम्यक कोकण कला संस्थेच्या गुहागर शाखेतर्फे संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती तसेच तालुका शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘कलावंतांचा सन्मान सोहळा’ उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. २८ मार्च रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत शृंगारतळी येथील भवानी सभागृह (पालपेणे रोड) येथे हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी राज्यसंघटनेचे प्रमुख पदाधिकारी सुप्रसिद्ध कवी – गायक अध्यक्ष मंदार कवाडे, सचिव नरेश शिंदे, उपाध्यक्ष मुकुंद तांबे, सुप्रसिद्ध गायिका, उपाध्यक्षा अष्टशीला बनसोडे, गायक, कोषाध्यक्ष सुभाष सावंत, गायक, मुख्य संघटक संजय गमरे, कवी – गायक, सदय विजय पवार, सल्लागार चंद्रमणी घाडगे, दापोली-मंडणगड-खेड तालुकाध्यक्ष वामन तांबे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संगीतमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध बेंजो मास्टर सुदेश जाधव, ढोलक वादक सनम किल्लेकर ऑक्टोपॅड वादक शैलू, ऑर्गन प्लेअर प्रवीण पवार यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून सम्यक कोकण कला संस्था महाराष्ट्रभर कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित प्रतिभेला संधी देणे आणि दुर्लक्षित कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे. प्रबोधनपर गीतगायन, सामाजिक जाणिवा आणि मूल्याधिष्ठित कलाविष्कार यांचा वारसा जपणाऱ्या या संस्थेने अनेक कवी, गायक व वादक घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
याच कार्याचा गौरव म्हणून गुहागर तालुक्यातील प्रबोधनपर गीतगायनाच्या माध्यमातून समाजजागृती करणाऱ्या कवी, गायक आणि वादकांचा प्रथमच एकत्रित सन्मान करण्यात येणार आहे. सुमारे ५० हून अधिक कलावंतांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कलाकार आणि कला रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यासोबतच कवी, गायक व वादकांच्या सादरीकरणातून रंगणारा प्रबोधनपर सांगीतिक कार्यक्रमही या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी ज्येष्ठ कवी बी. जी. पवार गुरुजी (अध्यक्ष), कवी संतोष मोहिते सर (उपाध्यक्ष), उत्तम पवार (सचिव), दीपक गमरे (सहसचिव), मिलिंद कदम (कोषाध्यक्ष), भीमसेन सावंत (सल्लागार), सुदेश जाधव (सल्लागार), प्रवीण पवार (कार्य. सदस्य), तसेच अविनाश गमरे, मनोज जाधव विशेष मेहनत घेत आहेत.
कलावंतांचा सन्मान, त्यांच्या कलेला योग्य प्रतिष्ठा मिळवून देणे आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील कला क्षेत्रासाठी हा सोहळा एक नवा अध्याय ठरणार असून, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.



