दाभोळ किनाऱ्यावर अडकलेल्या डॉल्फिनला तरुणांनी दिले जीवदान

दापोली : तालुक्यातील दाभोळ समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास एक डॉल्फिन अचानक किनाऱ्यावर येऊन अडकला. किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या तरुणांनी एकजुटीने आणि अत्यंत संयमाने प्रयत्न करत डॉल्फिनला अलगदपणे पुन्हा समुद्रात सोडले.
भरती-ओहोटीतील बदल किंवा दिशाभूल झाल्यामुळे हा सागरी जीव किनाऱ्यावर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सायंकाळच्या सुमारास किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या काही जागरूक तरुणांच्या ही बाब लक्षात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
दाभोळ येथील बामणे मोहल्ल्यातील शाजेब बामणे, मुसाब बामणे, इबाद बामणे, निसार बामणे, अस्मान बामणे, सैफ बामणे आणि इनात हमदुले यांनी एकजुटीने आणि अत्यंत संयमाने प्रयत्न करत डॉल्फिनला अलगदपणे पुन्हा समुद्रात सोडले. डॉल्फिन किनाऱ्यावर अडकले असताना त्याला कोणतीही इजा होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच गर्दी आणि गोंधळ टाळत शांततेत हे बचावकार्य पार पाडण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर अखेर डॉल्फिन सुरक्षितपणे खोल पाण्याकडे परत गेल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.



