मुख्य बातमी

भगवती नगरच्या लोकनियुक्त सरपंच प्रगती भोसले यांची कायदेशीर लढाई यशस्वी

पुन्हा सरपंच पदी विराजमान

रत्नागिरी : तालुक्यातील भगवती नगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्रगती भोसले यांनी अखेर प्रशासकीय आणि राजकीय संघर्षावर मात करत विजय मिळवला आहे. प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना सरपंच पदावरून हटवण्यात आले होते. मात्र, या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देत सौ. भोसले यांनी पुन्हा एकदा आपले सरपंच पद मिळवून लोकशाहीचा विजय मिळवला आहे. गुरुवारी त्यांनी मोठ्या उत्साहात आपला पदभार पुन्हा स्वीकारला.

सौ. प्रगती भोसले या विरोधी पक्षातून निवडून आल्यामुळे त्यांना राजकीय द्वेषापोटी दोनवेळा सरपंच पदावरून खाली ओढण्याचे प्रयत्न झाले. एका बाजूला महिला सन्मानाच्या गप्पा मारणारे सरकार दुसरीकडे निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीची कोंडी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र, खचून न जाता सौ. भोसले यांनी न्यायालयावर विश्वास ठेवून कायद्याची लढाई सुरू ठेवली आणि प्रशासकीय आरोप खोडून काढत पुन्हा सन्मानाने पदभार स्वीकारला.

गुरुवारी झालेल्या पुनर्पदग्रहण सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव व सुभाष रहाटे आणि विभाग प्रमुख उत्तम मोरे यांनी उपस्थित राहून सौ. भोसले यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी बोलताना तालुकाप्रमुख श्री. पाटील म्हणाले की, “हा विजय केवळ सौ. प्रगती भोसले यांचा नसून भगवती नगरमधील जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे. सरकारकडून सत्तेचा गैरवापर करून जनतेने निवडलेल्या महिला सरपंचाला त्रास देण्याचे काम झाले, पण भोसले आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांच्या खंबीरपणामुळेच आज सत्याचा विजय झाला आहे.”

सौ. प्रगती भोसले पुन्हा सरपंच पदी विराजमान झाल्यामुळे भगवती नगर ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

न्यायालयातून लढाई जिंकूनही प्रशासनामार्फत ऑर्डर देण्यात दिरंगाई होत होती. ही बाब जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा संघटक संतोष थेराडे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सरपंच सौ. भोसले यांनी त्यांचे आभार मानले. व विकासकामात कोणताही अडथळा येऊ न देता जनतेच्या विश्वासाला पात्र ठरू, असा विश्वास सौ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!