अनिता नारकर ठरल्या “आस्था सुपर मॉम” पुरस्काराच्या मानकरी
जागतिक महिला दिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशनतर्फे आयोजन

रत्नागिरी : आरती निराधार सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत ४७ वृद्ध, दिव्यांग, निराधार व पीडित महिलांना आधार देणाऱ्या आणि आपल्या मुलीसह अनेक दिव्यांग व वृद्धांचे मातृत्व स्वीकारणाऱ्या सौ. अनिता आत्माराम नारकर यांना आस्था सोशल फाउंडेशन, रत्नागिरीच्या वतीने “सुपर मॉम” पुरस्कार सौ. सम्राज्ञी संजय चाळके यांच्या हस्ते आज (८ मार्च) प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

सौ. नारकर या गिरणी कामगाराच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या. त्यांचे शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबई महानगर पालिकेत त्यांनी १९७८ ते २०१४ कालावधीत सेवा बजावली. त्यांना दोन अपत्य आहेत. त्यातील ‘आरती’ ही बौद्धिक अक्षम प्रकारातील दिव्यांग असून, ती सध्या ४६ वर्षांची आहे. घरातील कामे ती उत्तमरित्या आवडीने करते. तिने मॅरेथॉन खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. समाज सेवेची आवड व आपल्या मुलीचे अपंगत्व यामुळे सौ. नारकर यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर २०१८ साली चिपळूण तालुक्यातील पेढे येथे ‘आरती निराधार सेवा फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली व आता मालघर येथे देखील संस्थेच्या या कामाची सुरवात झाली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरणप्रसंगी “आस्था”च्या सुरेखा पाथरे यांनी सौ. अनिता नारकर यांची मुलाखत घेत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सौ. अनिता नारकर, आत्माराम नारकर, आरती नारकर, श्रीम. अनघा जैतपाळ, “आस्था”चे पालक, कार्यकर्ते उपस्थित होते.



