मुख्य बातमी

सुहास भोळे यांची अभिवाचन कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : येथील हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ रंगधर्मी सुहास भोळे यांची तीन दिवसांची अभिवाचन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर आणि जीजीपीएसच्या माजी शिक्षिका सौ. सई साने यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

सुहास भोळे हे गेली पन्नास वर्षे रंग देवतेच्या सेवेत जिज्ञासा थिएटर्सच्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत. ते स्वतः यंत्र अभियंता असले, तरी ते अनेक कलांमध्ये पारंगत आहेत. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भोळे यांनी आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना अशा कार्यशाळेत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सकारात्मक विचार रुजवता येतात, असे मत मांडले.

तीन दिवसांच्या या कार्यशाळेत अभिवाचनासाठी अत्यावश्यक गोष्टी, शब्द सामर्थ्य, उच्चार शास्र, ओंकाराचे महत्त्व, यामुळे मेंदू, मज्जासंस्था, श्वसन व शरिरातील ऑक्सिजनची पातळी, शरिरातील कंपने आणि पेशींवर होणारे परिणाम, तणाव संप्रेरकांमध्ये होणारे बदल यांची जाणीव करून देण्यात आली. त्याचबरोबर आवाजाचे तंत्र समजण्यासाठी श्वसनाचे विविध प्रकार समजावून सांगण्यात आले. सोबत वाचन आणि अभिवाचन यातील फरक समजावून सांगण्यात आला. विविध भावभावनांची माहिती देण्यात आली.

बोलीभाषा आणि शुद्ध लेखन यातील उच्चारांची विविधता समजावून देण्यात आली. शब्द उच्चारताना वापरले जाणारे अवयव आणि त्यांचा कसा वापर करावा हे शिकविण्यात आले. केवळ आवाज कसा आहे यापेक्षा आपले उच्चार कसे आहेत यावर अभिवाचनाची यशस्वीता अवलंबून असते याची जाणीव करुन देण्यात आली. भावभावना समजण्यासाठी नवरसांची माहिती देण्यात आली. प्रत्येक शिबिरार्थीकडून अनेक वेगवेगळी वाक्ये तसेच स्वलिखीत उताऱ्यांचे वाचन आणि काही नाट्य व कादंबरी मधील उताऱ्यांचे वाचन करुन घेण्यात आले.

अशा प्रकारची कार्यशाळा आम्ही आमच्या प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी जरुर सातत्याने आयोजित करू, असे आश्वासन मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर यांनी समारोपप्रसंगी दिले. कार्यशाळेतील सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!