पंचायत समिती कार्यालयाची पाणीटंचाई दूर
उपसभापती अभिजीत गुरव यांच्या पुढाकारातून कायमस्वरूपी उपाययोजना

राजापूर : तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडे तयार करणाऱ्या राजापूर पंचायत समिती कार्यालयालाच अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांनी यावर सुयोग्य नियोजन करत कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. हर्डी गावांमधून वाहणाऱ्या नदीचे पाणी पंपाच्या साह्याने थेट पंचायत समिती आवारात आणण्यात यश आले असून त्यामुळे कार्यालयाची पाणीटंचाई दूर झाली आहे.
राजापूर पंचायत समिती ही तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींचे प्रशासकीय केंद्र मानली जाते. तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे सत्ताकेंद्र म्हणून ओळख असलेल्या या कार्यालयातून टंचाईग्रस्त गावांचे कृती आराखडे तयार केले जातात. मात्र विडंबनात्मक परिस्थिती अशी होती की, स्वतः पंचायत समिती कार्यालयालाच पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
राजापूर नगरपालिकेचे नळ संयोजन पंचायत समितीत असले तरी टंचाईच्या काळात नळांना पाणी येत नव्हते. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आवारातील शौचालयांमध्येही पाणी नसल्याने नाराजी व्यक्त होत होती.
या समस्येबाबत अनेकांनी उपसभापती अभिजीत गुरव यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेतली. गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत पोवार यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी उपाययोजनांवर चर्चा केली. तसेच तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या.
गुरव यांनी स्वतः अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करत हर्डी गावांमधून वाहणाऱ्या नदीचे पाणी पंपाद्वारे पंचायत समितीत आणण्याची कल्पना मांडली. सुरुवातीला या योजनेसाठी सुमारे १५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र गुरव यांनी यामध्ये बारकाईने लक्ष घालत खर्च कमी करण्यावर भर दिला. त्यानंतर नव्याने नियोजन करून अवघ्या चार लाख रुपयांच्या खर्चात ही योजना पूर्ण करण्यात आली.
अत्यंत कमी कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करत पंचायत समिती आवारात मुबलक पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकप्रतिनिधींनी दूरदृष्टी ठेवून नियोजनबद्ध काम केल्यास कमी खर्चातही प्रभावी उपाययोजना राबविता येतात, याचे उदाहरण अभिजित गुरव यांनी या उपक्रमातून दाखवून दिल्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात सुरू आहे. पंचायत समिती कार्यालय प्रथम टंचाईमुक्त झाले तरच तालुक्यातील टंचाई व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करता येईल, हा दृष्टिकोन ठेवून गुरव यांनी केलेल्या या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



