मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुन्हा होण्यापूर्वी जागरूकता महत्त्वाची : डॉ. भारत कऱ्हाड

दापोली : “पोलीस प्रशासनाकडून गुन्ह्यांचा तपास जलदगतीने होत असून अनेक गुन्हेगार तत्काळ पकडले जात आहेत. मात्र गुन्हा घडू नये यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे अधिक महत्त्वाचे आहे. शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांनी या विषयात अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्याचे निवृत्त एसीपी विनीत चौधरी आणि त्यांच्या पत्नी शैलजा चौधरी यांनी आज वराडकर बेलोसे महाविद्यालय येथे सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कऱ्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सायबर गुन्हे, सोशल मीडिया फसवणूक आणि भावनिक शोषणाच्या घटनांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. विनीत चौधरी यांनी महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महिला सायबर अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्याची सूचना केली. विशेषतः मुलींना ऑनलाईन आमिष, फसवणूक आणि चुकीच्या संबंधांपासून सावध करण्यासाठी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांची व्याख्याने आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षण, करिअर आणि सुरक्षित भविष्य यांना प्राधान्य देत कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असा संदेश या भेटीतून देण्यात आला. शैलजा चौधरी या वराडकर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!