महाराष्ट्रमुख्य बातमी

ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

मुंबई : प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे खंदे पुरस्कर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी (कॅन्सर) झुंज देत होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने वैद्यकीय, साहित्य, नाट्य आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. नाडकर्णी हे मुक्तांगण संस्थेचे विश्वस्त देखील होते.

डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे केवळ एक डॉक्टर नव्हे, तर मानवी मनाचे गुंफण उलगडणारे एक चालते-बोलते विद्यापीठ होते. १९८० मध्ये एमबीबीएस आणि १९८४ मध्ये मानसोपचारशास्त्रात एमडी पदवी मिळवतानाच, त्यांच्या मनात या क्षेत्रातील सामाजिक बदलाचे बीज पेरले गेले. मनोविकारांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी केवळ विचार केला नाही, तर २३ मार्च १९९० रोजी ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (आयपीएच) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज ‘आयपीएच’ ही केवळ एक क्लिनिक राहिलेली नाही.

६० तज्ज्ञ डॉक्टर, २५ आधार सदस्य आणि ३०० हून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या बळावर ही संस्था मानसिक आरोग्यासाठी एक भक्कम आधारवड बनली आहे. याव्यतिरिक्त, पुण्यातील प्रसिद्ध ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या’ उभारणीतही त्यांचा संस्थापक सदस्य म्हणून मोलाचा वाटा राहिला आहे. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतंच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था काम करते. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्पकतेने वापर केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!