रत्नागिरीत बंद घर फोडून ४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास
रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांचा समावेश

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ८ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी ओंकार रामचंद्र पाडावे (वय ३२, रा. मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ मे रोजी रात्री ८ ते १७ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांचे घर बंद असल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप लोखंडी रॉडने तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा अर्धवट मोडून आतील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडले आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोकड चोरून नेली.
चोरट्याने नेलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम ५० हजार रुपये (५०० रुपयांच्या एकूण १०० नोटा), सोन्याचे मंगळसूत्र २ लाख ४० हजार रुपये किमतीचे (वजन ४ तोळे ८ ग्रॅम), सोन्याची चैन ३४ हजार ३६५ रुपये किमतीची (वजन ६ ग्रॅम ६७० मिली), सोन्याची अंगठी २५ हजार रुपये किमतीची (वजन ५ ग्रॅम), सोन्याचे कानातले टॉप्स एकूण ३५ हजार रुपये किमतीचे (३ ग्रॅम आणि ४ ग्रॅम वजनाचे दोन जोड), सोन्याचे कानवेली १० हजार रुपये किमतीचे (वजन २ ग्रॅम), सोन्याची बेबी रिंग १० हजार ८२७ रुपये किमतीची (वजन १ ग्रॅम ०.३० मिली), सोन्याची नथ ३ हजार रुपये किमतीची (वजन ७०० मिली) यांचा समावेश आहे.
या घरफोडीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(क), ३३१(३) आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.



