बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी प्रयत्न करणार : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
बुरोंडी जेट्टीमुळे दापोली तालुक्यातील मत्स्यव्यवसायाला मिळणार मोठी चालना

मुंबई : बुरोंडी (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती मिळत आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता तसेच मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनां करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
बुरोंडी (ता. दापोली) मच्छीमार जेट्टी संदर्भात आयोजित बैठकीत श्री राणे बोलत होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, केदार साठे, शिवानी गावकर, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. राणे म्हणाले,रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सागरी जिल्हा असून जिल्ह्याला तब्बल २३७ किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. मिरकरवाडा बंदरानंतर दापोली तालुक्यातील हर्णे बंदराला विशेष महत्त्व आहे. हर्णे, दाभोळ आणि बुरोंडी ही मासळी उतरविण्याची प्रमुख केंद्रे मानली जातात. बुरोंडी हे मोठे मच्छीमार गाव असून येथील लोकसंख्या सुमारे ७ ते ८ हजारांच्या दरम्यान आहे. गावात नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्था कार्यरत असून सुमारे २५०२ सभासद या संस्थेशी जोडलेले आहेत.
बुरोंडी परिसरात सुमारे १०० नोंदणीकृत मासेमारी नौका असून त्यामध्ये एक व दोन सिलेंडरच्या नौकांची संख्या अधिक आहे.
यासंदर्भात मंत्री नितेश राणे म्हणाले, “बुरोंडी येथील मच्छीमारांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. मच्छीमारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करणे हे राज्य शासनाचे प्राधान्य आहे. बुरोंडी येथे जेट्टी उभारल्यास वाहतूक खर्च कमी होईल, मासळीचा दर्जा टिकून राहील आणि स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईल.”, “जेट्टीमुळे मच्छीमारांना मासळी थेट उतरविणे शक्य होईल. डिझेल, पाणी आणि इतर साहित्य सहज उपलब्ध होईल. वादळी हवामानात नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल. तसेच पर्यटन आणि व्यापारी हालचालींनाही चालना मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.”
दरम्यान, “Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund (FIDF)” या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत हर्णे मत्स्य बंदर विकासाचे काम सुरू असून, त्याच धर्तीवर बुरोंडी येथेही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न केले जात आहे.. बुरोंडी जेट्टी प्रकल्पामुळे दापोली तालुक्यातील मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे श्री राणे यांनी सांगितले.


