आंबा घाटात रिक्षाचा अपघात; रिक्षाचालक गंभीर

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ रिक्षाचा झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज (२२ मे) पहाटे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच-०९-इएल- २६०८) कोल्हापूर ते गणपतीपुळे असा जात असताना आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ आली असता पहाटे ४ ते ५ या वेळेत रिक्षाचा भीषण अपघात झाल्याचे समजते; मात्र हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. अज्ञात वाहनाची धडक बसून हा अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अपघात एवढा भीषण होता की रिक्षा चालक रिक्षाखाली होता. रिक्षा पूर्णपणे पेढ्याच्या बॉक्सनी भरलेली होती. तो गणपतीपुळे येथे दुकानदारांना माल देण्यासाठी जात होता. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रिक्षा चालकाला सहकाऱ्यांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले; मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. साखरपा पोलिसांनी पंचनामा करून या अपघाताचा तपास करीत आहेत.


